PMRDA: पीएमआरडीएच्या भूखंडावर भाडेकरू कंपनीची 'दादा'गिरी, तीन कोटींचे भाडे थकवले

By नारायण बडगुजर | Published: January 4, 2024 11:17 AM2024-01-04T11:17:32+5:302024-01-04T11:19:29+5:30

पीएमआरडीएसमोर थकबाकी वसुलीचे आव्हान...

PMRDA: Tenant company's 'grandfathering' on PMRDA plot, defaults on rent of Rs 3 crore | PMRDA: पीएमआरडीएच्या भूखंडावर भाडेकरू कंपनीची 'दादा'गिरी, तीन कोटींचे भाडे थकवले

PMRDA: पीएमआरडीएच्या भूखंडावर भाडेकरू कंपनीची 'दादा'गिरी, तीन कोटींचे भाडे थकवले

पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (पीएमआरडीए) मोशी येथील चार एकरातील ट्राफिक पार्क भाडेतत्त्वार देण्यात आला होता. या पार्कमधील ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅकच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपये उत्पन्न घेत असतानाही संबंधित भाडेकरू कंपनीकडून तीन कोटींचे भाडे थकवले आहे. तसेच गेल्याच वर्षी करार संपल्यानंतरही या कंपनीकडून ट्राफिक पार्कवरील ताबा सोडण्यास नकार देण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या नावाने या कंपनीकडून ‘दादा’गिरी केली जात असल्याची चर्चा आहे.  

तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोशी येथे पेठ क्रमांक सहामध्ये चार एकर जागेत ट्राफिक पार्क उभारला. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती होण्यासाठी पार्कची उभारणी करण्यात आली. शहरातील नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना घेण्यासाठी वाहन चालविण्याची चाचणी परिवहन विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याच्या उपस्थितीत घेतली जाते. त्यासाठी टेस्ट ड्राईव्ह ट्रॅकची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने ट्राफिक पार्कमधील ट्रॅक पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात आला.

दरम्यान, मोशीतील ट्राफिक पार्क हा महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज प्रा. लि. या कंपनीला १ मे २०१८ ते ३० एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आला. त्यामुळे पार्कमधील ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक देखील कंपनीकडून संचालित करण्यात आला. त्यासाठी कंपनीकडून शुल्क आकारणी करण्यात येत आहे. वाहन चालविण्याची चाचणी देणाऱ्या वाहनचालकाकडून हे शुल्क घेतले जाते.

तीन टप्प्यांमध्ये भाडेआकारणी

ट्राफिक पार्कसाठी महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज कंपनीकडून २०१८ ते २०२० या कालवधीत दरमहा तीन लाख ६० हजारांसह १८ टक्के जीएसटी इतके भाडे आकारण्यात आले होते. तसेच २०२० ते २०२२ या कालवधीत दरमहा चार लाख १४ हजारासह १८ टक्के तर २०२२ ते २०२३ या कालावधीत दरमहा चार लाख ७६ हजार १०० रुपयांसह १८ टक्के जीएसटी इतके भाडे आकारण्यात आले.

पीएमआरडीएसमोर थकबाकी वसुलीचे आव्हान

ट्राफिक पार्कचा पाच वर्षांचा भाडेकरार गेल्यावर्षी एप्रिल अखेरीस संपला. त्यानंतरही महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज या कंपनीकडून ट्राफिक पार्कचा ताबा पीएमआरडीएला देण्यात आलेला नाही. तसेच कंपनीने भाडेरक्कम देखील थकवली. दोन कोटी ९८ लाख ६० हजार इतकी ही रक्कम असून ही रक्कम वसुलीचे पीएमआरडीए प्रशासनासमोर आव्हान आहे.

ना ताबा, ना भाडे

पीएमआरडीए प्रशासनाने ट्राफिक पार्कचा ताबा देण्याबाबत महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज कंपनीकडे पत्रव्यवहार केला. मात्र, कंपनीकडून ताबा देण्यात आलेला नसून, ताबा न सोडता कंपनीकडून ‘दादा’गिरी केली जात आहे. तसेच प्रशासनाने भाडेरक्कमही मागितली. मात्र, त्यासाठीही कंपनीकडून चालढकल करण्यात येत आहे.

बारामती कनेक्शन?

‘महलक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ या कंपनीवर राज्यातील बड्या राजकीय नेत्यांची कृपादृष्टी असल्याचे बाेलले जात आहे. तसेच या कंपनीचे संचालक हे बारामती येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत कंपनीच्या मोशी येथील अधिकारी तसेच पुणे कार्यालयातील मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी याबाबत बोलण्यास असमर्थता व्यक्त केली.

Web Title: PMRDA: Tenant company's 'grandfathering' on PMRDA plot, defaults on rent of Rs 3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.