पीएमपीचे कामकाज आता मराठीत; सर्व विभागप्रमुखांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:58 IST2025-02-22T16:53:09+5:302025-02-22T16:58:17+5:30
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून काढलेल्या आदेशात सर्व प्रशासकीय कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याच्या सूचना

पीएमपीचे कामकाज आता मराठीत; सर्व विभागप्रमुखांना आदेश
- अंबादास गवंडी
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) सर्व विभागांमधील प्रशासकीय कामकाजामध्ये यापुढे मराठी भाषेचा वापर करण्यात यावा, अशा सूचना पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून काढलेल्या आदेशात सर्व प्रशासकीय कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पीएमपी प्रशासनाकडून हे आदेश काढले आहे.
पीएमपीमधील सर्व पत्रव्यवहार, कार्यालयातील कामकाज, सर्वसामान्यांपर्यंत जाणारे सर्व नमुने, पत्रके, परवाने, नोंद वह्या, प्रमाण नमुने, प्रपत्रे, विभागीय नियम पुस्तिका, सर्व प्रकारच्या टिपण्या, शेरे, अभिप्राय, आदेश, अधिसूचना, प्रारूप नियम, कार्यालय परिपत्रके, करारनामे, अहवाल, बैठकांची इतिवृत्त, इत्यादी मराठी भाषेमध्ये करणे आवश्यक आहे.
कार्यालयातील नामफलकावर एखादी व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी यांचे नाव मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक आहे. विशेषतः ही नावे मराठी भाषेत लिहिताना इंग्रजी अद्याक्षरांचे भाषांतर न करता मराठीतूनच लिहावे. तसेच कार्यालयातील निविदा, ठेकेदारांशी केलेले करार/वेगवेगळ्या कंपन्या, आस्थापनांशी केलेले करार राजभाषा अधिनियम १९६४ नुसार हे सर्व मराठी भाषेतून करावे, असे या आदेशामध्ये म्हटले आहे.