पुणे : चेन्नई येथील ‘स्विच’ कंपनीकडून मागविण्यात आलेली वातानुकूलित इलेक्ट्रिक ‘डबल डेकर’ बस मंगळवार (दि. १६) रोजी दाखल झाली. त्यानंतर हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा ‘आयटी हब’कडे जाणाऱ्या रस्त्यांवर चाचणी घेण्यात येणार आहे. ‘बृहनमुंबई इलेक्ट्रीक सप्लाय ॲण्ड ट्रान्सपोर्ट’च्या (बेस्ट) धर्तीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरातील सार्वजनिक वाहूतक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी डबल डेकर बस पीएमपी ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे. पुढील पंधरा दिवस डबल डेकर बसची चाचणी घेतली जाणार आहे.
पीएमपी प्रशासनाने गेल्या पाच वर्षांपासून डबल डेकर बस ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन करत होते. परंतु त्याला मूर्त स्वरूप आले नाही. नव्याने दाखल झालेले अध्यक्ष पंकज देवरे यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून वाहतूक कोंडीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आयटी क्षेत्रात डबलडेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत चेन्नईतील स्विच कंपनीसोबत बैठक घेऊन चाचणी घेण्यासाठी पथकाला निमंत्रण देण्यात आले आहे. मंगळवारी ही बस पुण्यात दाखल झाल्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या फेरी मारून चाचणीला सुरुवात झाली. यावेळी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अशी आहे डबल डेकर बस
-एकूण ६० सेटिंग आणि २५ स्टँडिंग अशी ८५ प्रवाशांची क्षमता आहे.-पहिल्या टप्प्यात दहा बस पीएमपीच्या ताब्यात आणण्याचे नियोजन आहे.-स्विच कंपनीची बस आहे.-बसची उंची ४.७५ मीटर.-बसची रुंदी २.६ मीटर.-बसची लांबी ९.५ मीटर आहे.-बस संपूर्ण वातानुकूलित इलेक्ट्रिक असून, दोन कोटी रुपये किंमत आहे.