'पीएमपी'ने थकवले वैद्यकीय बिल; कर्मचारी मात्र उपचारापासून वंचित..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:18 IST2025-11-13T15:17:23+5:302025-11-13T15:18:40+5:30
- रुग्णालयांचे २० कोटींहून अधिक बिले थकीत; ९० टक्के पीएमपी १० टक्के कर्मचाऱ्यांचा वाटा

'पीएमपी'ने थकवले वैद्यकीय बिल; कर्मचारी मात्र उपचारापासून वंचित..!
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचारासाठी शहरातील काही रुग्णालयांबरोबर करार करण्यात आला आहे. परंतु, रुग्णालयांचे २० कोटींहून अधिक वैद्यकीय बिले गेले काही महिन्यांपासून थकविल्याने कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय उपचार करणे बंद केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा फटका बसत आहे.
पीएमपीकडून कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी ‘अंशदायी वैद्यकीय सहाय योजना’ राबविली जाते. यात जवळपास आठ हजार ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील आई-वडील, पत्नी, दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळतो. त्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतनातून २ टक्के रक्कम कपात केली जाते. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केले जाणाऱ्या साधारण ७५ लाख रुपये दर महिन्याला वैद्यकीय योजनेसाठी गोळा केले जातात.
या योजनेत उपचाराचा खर्च पीएमपी ९० टक्के आणि दहा टक्के स्वतः भरावा लागतो. या योजनेत शहरातील सर्व नामांकित अशा ७२ पेक्षा जास्त रुग्णालयामध्ये उपचार घेता येतात. शिवाय तीन हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनाही या योजनेतून उपचार मिळते. यामुळे त्यांना दिलासा मिळतो. परंतु, गेल्या दीड वर्षापासून पीएमपीकडून महत्त्वाच्या हॉस्पिटलची बिले थकली आहेत. त्यामुळे हॉस्पिटलकडून उपचार बंद केले आहे.
या आहेत महत्त्वाच्या हॉस्पिटल :
पूना हॉस्पिटल एक कोटी, दीनानाथ मंगेशकर साठ लाख, केईएम दोन कोटी, नोबेल दीड कोटी, जहांगीर एक कोटी, बुधराणी, सह्याद्री अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या हाॅस्पिटलची बिले थकली आहेत. याशिवाय काही महत्त्वाच्या हॉस्पिटलकडून पैसे मिळत नसल्यामुळे उपचार बंद केले होते. आता इतरही हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना उपचार मिळणे बंद झाले आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत म्हणून प्रयत्न करावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
वेळेत बिल भरा :
पीएमपीकडून करार केलेल्या हाॅस्पिटलच्या बिलांचे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जातात. नुकतेच पीएमपीकडून नोबेल हाॅस्पिटलचे एक कोटी बिल भरले आहे. इतर हॉस्पिटलची बिले बाकी आहे. जसे निधी येईल तशी बिले दिली जातात. तरीही हॉस्पिटलकडून उपचार बंद केले आहेत. इतर सरकारी विभागाची बिले थकले तरी त्यांना उपचार दिले जातात. पण, पीएमपीचे बिल थकले तर उपचार बंद करणे योग्य नसल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. परंतु, हाॅस्पिटलची बिले वेळेत भरली पाहिजे, असे कर्मचारी संघटनेने मागणी केली आहे.
अशी आहे आकडेवारी :
- एकूण कर्मचारी - ८३००
- करारबद्ध हाॅस्पिटल - ७२
- थकीत रक्कम : २० कोटी