PMC Elections : भाजपमध्ये आयारामांची चलती, निष्ठावंताचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:40 IST2025-12-21T15:38:50+5:302025-12-21T15:40:40+5:30
- भाजपचा दोन्ही राष्ट्रवादीला जोरदार झटका; वडगावशेरी, खडकवासला, हडपसर मतदारसंघात वाढली ताकद

PMC Elections : भाजपमध्ये आयारामांची चलती, निष्ठावंताचे काय?
पुणे :पुणे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील दोन माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे भाजपने दोन्ही राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला आहे. गेल्या काही महिन्यापासून पुणे शहर भाजपमध्ये आयारामाची चलती असून निष्ठावंताचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भाजपच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात हे प्रवेश झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक योगेश मुळीक आदीं उपस्थित होते. भाजपने वडगावशेरी, खडकवासला, हडपसर या विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांना गळाला लावल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे पुत्र कणव चव्हाण, वडगाव बुद्रुक-धायरी भागातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास दांगट आणि पाषाण भागातील माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, धनकवडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे आणि वारजे भागातील माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेणाऱ्या पॅनलमध्ये सचिन दोडके होते. त्याच सचिन दोडके यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’तील नारायण गलांडे, खंडू लोंढे, हडपसर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या वैशाली तुपे, विराज तुपे, खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे, शुभांगी होले (शिवरकर), राजेंद्र लोखंडे, बाबा शिवरकर, विद्यानंद बोंद्रे, इंदिरा तुपे याचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे डॉ. अमोल देवडेकर, खडकवासला गावे माजी सरपंच संतोष मते, वारजेचे भारतभुषण बराटे, हडपसरचे प्रशांत तुपे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आयात विरुद्ध निष्ठावंतांमध्ये संघर्ष वाढणार
भाजपमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटातील पाच नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला हाेता. त्यानंतर अन्य पक्षांतील काही माजी नगरसेवक हे भाजपमधील प्रवेशासाठी ‘वेटिंग’वर होते. अखेर भाजपमध्ये २२ जणांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंत इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. भाजपमध्ये आयात विरुद्ध निष्ठावंतांमध्ये संघर्ष आता वाढणार आहे.
आबा बागुल यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर आबा बागुल यांचे पुत्र हेमंत बागुल हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण भाजपमधील प्रवेशाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेच्या शिंदेगटात ठाणे येथे जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे.
आमदार भीमराव तापकीर यांचा विरोध डावलून दोडके, दांगट यांना प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक सचिन दोडके आणि माजी नगरसेवक विकास दांगट यांच्या प्रवेशाला भाजपचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विरोध केला होता. दोडके यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून खासदार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात वाद झाला होता. तरीही सचिन दोडके यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
वडील मुलाखती घेताता, मुलगा भाजपमध्ये प्रवेश करतो
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेणा०या पॅनलमध्ये आमदार बापू पठारे यांचा समावेश होता. पण त्याच बापु पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेंद्र पठारे यांचा प्रवेश भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे तीन महिने रखडला होता. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपाने हा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.
तटकरे यांच्या फोनमुळे थांबले अनेकांचे प्रवेश
राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटातील आणखी काही माजी नगरसेवकांचे भाजपमध्ये प्रवेश होणार होते. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्यामुळे अनेक माजी नगरसेवकांचे प्रवेश थांबले आहेत.