PMC Elections : निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:38 IST2025-12-17T11:37:55+5:302025-12-17T11:38:34+5:30
महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी उशिरा जाहीर करणार आहेत.

PMC Elections : निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी उशिरा जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवसभर बारामती होस्टेलमध्ये पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रभागनिहाय आढावा घेतला. यावेळी पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतरच पक्षांतराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवडमधील अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये मंगळवारी प्रवेश केला. पुणे शहरातील काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती आज (बुधवार) पासून सुरू होणार आहेत. या मुलाखती दोन दिवस सुरू राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती उद्या गुरुवारी म्हणजेच १८ डिसेंबरला होणार आहेत.