PMC Elections : येरवड्यात स्मशानभूमी सुसज्ज, जीवंतपणी वेदना; नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:45 IST2025-11-05T15:44:10+5:302025-11-05T15:45:01+5:30
पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून येरवडा पालिकेत पण विकासापासून वंचितच

PMC Elections : येरवड्यात स्मशानभूमी सुसज्ज, जीवंतपणी वेदना; नागरिक त्रस्त
- विशाल दरगुडे
चंदननगर :पुणे महानगरपालिकेच्या सीमेत समाविष्ट असलेला येरवडा परिसर हा उपनगरातील सर्वात जुना आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. येरवड्याची अमरधाम स्मशानभूमी सुसज्ज सर्व सुविधा पाहिल्या तर मेल्यावर जेवढी काळजी घेतली आहे, तर जीवंतपणे प्रभागातील सर्व सुविधा नक्की असतील, असे वाटते. मात्र, तसे अजिबातच नाही. येथील सुविधा म्हणजे ‘मेल्यावर सुविधा, जीवंतपणी वेदना’ अशीच आहे.
विकासाच्या नावाखाली झगमगणाऱ्या पुणे शहरात, येरवड्यासारखा भाग अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. येरवडा हे पुण्याच्या उपनगरातील पहिले गाव. ब्रिटिश काळापासून या भागाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. बंडगार्डन बंधारा हे प्रसिद्ध धरण महात्मा फुले यांनी बांधले होते आणि त्याच पाण्याचा पुरवठा कॅम्प परिसरात होत होता. पुणे सबअर्बन मंडळातील पहिले उपाध्यक्ष बाबुराव रामभाऊ राजगुरू हे येरवड्याचेच होते.
महापालिकेत समावेश झाल्यानंतर येथील गेनबा मोझे, हंबीरराव मोझे (महापौर), राज साळवे (स्थायी समिती सदस्य) अशा अनेक लोकप्रतिनिधींनी भागाचा चेहरा पालटण्याचा प्रयत्न केला. तरीही येरवड्याच्या अनेक प्रभागांमध्ये विकासाची गाडी आजही अडकलेली आहे. १९७२ मध्ये पानशेत धरण फुटल्यामुळे शहरातील हजारो नागरिकांचे पुनर्वसन येरवड्यात करण्यात आले. त्यामुळे येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली, पण त्यानुसार सुविधा वाढल्या नाहीत. आजच्या घडीला येरवडा परिसरात दोन प्रमुख गावठाण आहेत. येरवडा गावठाण आणि नवी खडकी गावठाण. सध्याच्या मनपा रचनेनुसार प्रभाग क्र. ६ ‘येरवडा–गांधीनगर’ असा प्रभाग तयार झाला आहे. यात गणेशनगर, सुभाषनगर, गाडीतळ, यशवंतनगर, बारातेवस्ती, बालाजीनगर, अशोकनगर, लक्ष्मीनगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, जेलप्रेस, कामराजनगर अशा विविध वस्त्यांचा समावेश आहे. या भागातील मतदार हा मराठा, दलित आणि मुस्लीम समाजाचे वर्चस्व आहे. सामाजिक विविधतेतून एकात्मता जपणारा हा भाग आहे; मात्र विकासाच्या बाबतीत सर्व समाज एकसमान त्रास सहन करीत आहेत.
- विकासाचा अभाव आणि शैक्षणिक अधोगती
येरवडा भागात पुणे महानगरपालिकेच्या दहा शाळा आहेत. यात नेताजी, आचार्य अत्रे, दगडू जाधव, वस्ताद साळवे, जगजीवन राम, यशवंतराव चव्हाण, अनुसया बापू सावंत, उर्दू शाळा, गेनबा मोझे आणि मातोश्री शाळा. तसेच कर्नल यंग शाळाही आहे.पण या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. वर्गात बसायला बाक नाहीत, शिक्षकांची कमतरता आहे, स्वच्छता गृह स्वच्छ नाहीत आणि पिण्याच्या पाण्याची स्थितीही बिकट आहे. परिणामी येथील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलचा उत्साह कमी होत आहे. शैक्षणिक दुर्लक्षामुळे अल्पवयीन गुन्हेगारीत वाढ झाली असून, काही मुलांचा वापर चरस-गांजाच्या व्यवहारांसाठी होत असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येते. परिसरात २४ तास खुले असलेले मद्यविक्री केंद्र या परिस्थितीला आणखी खतपाणी घालत आहेत.
- अतिक्रमण व वाहतूककोंडी
येरवड्यातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण हा गंभीर प्रश्न आहे. विशेषतः शीला साळवे भाजी मंडई परिसरात विक्रेते रस्त्यावर बसतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशामक वाहनांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय, अनेक वस्त्यांमध्ये अनधिकृत बांधकामे वाढली असून, रस्त्यांचा रुंदीकरण व नाल्यांचे स्वच्छता काम वर्षानुवर्षे रखडलेले आहे.
- आरोग्य सुविधा अपुऱ्या
२००७ साली सुरू झालेले राजीव गांधी रुग्णालय हे १०० खाटांचे असून, खासगी संस्थेकडून चालवले जाते. पण हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. फिजिओथेरपी आणि डायग्नोस्टिक सेंटरसाठी अनावश्यकपणे तीन संस्थांना काम देण्यात आले आहे. सध्या केवळ प्रसूतिगृह, कुटुंब नियोजन आणि साथीच्या आजारांच्या ओपीडीपुरतेच हे रुग्णालय मर्यादित आहे. हे पूर्ण क्षमतेने चालू केले, तर ससून रुग्णालयाचा ताण कमी होऊ शकेल, असा स्थानिकांना ससूनला जायचा ताण कमी होऊ शकतो.
- अस्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
येरवड्यातील काही भागांमध्ये ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते, असे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्यामुळे उद्भवणारे आजार भोगावे लागतात.याशिवाय, कचरा वेळेवर उचलला जात नाही. विशेषतः येरवडा गावठाण, कंजारभाट वस्ती, शिवराज चौक आणि लक्ष्मीनगर येथे कचऱ्याचे ढीग साचतात. दुर्गंधी, डास, आणि संसर्गजन्य रोग या सर्व समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.
- राजकीय स्थिती
येरवडा परिसरात विविध राजकीय पक्षांचे अस्तित्व असून, गेल्या काही दशकांत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय, एमआयएम आणि अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, भाजपला या भागात विशेष यश मिळालेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये येरवड्याच्या मतदारांनी महाविकास आघाडीला स्पष्ट पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे संजय भोसले सलग तीन वेळा आणि अविनाश साळवे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आहे. इतिहास आणि परंपरेने समृद्ध असलेला येरवडा आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शाळा, रस्ते, आरोग्य, पाणी, आणि स्वच्छतेच्या मूलभूत गरजांसाठी येथील नागरिक दिवसेंदिवस झगडत आहेत. एकीकडे मृत्यूनंतर विद्युत दाहिनी असलेली आधुनिक स्मशानभूमी, तर दुसरीकडे जिवंत माणसाला मूलभूत सुविधा न मिळणारा परिसर हेच येरवड्याचे वास्तव...