पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये युती आणि आघाडीचा गोंधळ शेवटपर्यंत न मिटल्याने सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले. या बंडखोरांची धास्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी घेतली आहे. मात्र, काही प्रभागातील बंडखोरांवर आश्वासनांची खैरात करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यात काही पक्षांना यश आले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते आपल्या पक्षातील बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न करत होते. यासाठी बंडखोरांना आश्वासने दिली जात होती. या आश्वासनांना काही बंडखोरांनी प्रतिसाद दिला तर काही नेत्यांचे काही एक न ऐकता आपले बंड कायम ठेवले. त्यात राष्ट्रवादीचे प्रमोद निम्हण, पूनम विधाते, शिवराज माळवदकर, राहुल पोकळे, विक्रम जाधव यांचा समावेश आहे.
दुसरीकडे भाजपसोबत युतीची चर्चा सुरू असल्याने शिंदे सेनेच्या नेत्यांनी सर्व प्रभागात निवडणूक लढवण्याचे योग्य नियोजन न करता जागावाटपाच्या बैठकांमध्ये वेळ घालवला. युती होणार नाही म्हटल्यावर ऐनवेळी एबी फॉर्म वाटप केल्याने एका ठिकाणी दोन-दोन फॉर्म दिले गेले. त्यामुळे माघार घेताना गोंधळ निर्माण झाला. तर महाविकास आघाडी आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा आणि चिन्हावरून निर्माण झालेला गोंधळ शेवटपर्यंत मिटू शकला नाही. त्यामुळे मित्र पक्षाचे उमेदवार अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.
माहिती देण्यास भाजप नेत्यांची टाळाटाळ
भाजपने निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील नेत्यांना आणि नेत्यांच्या मुलांना प्रवेश देऊन उमेदवारी देत निष्ठावंतांना डावलले. त्यामुळे काहींनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. तर काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे, खडकवासल्याचे माजी सरपंच संतोष मते, योगिता गोगावले, ॲड. मोना गद्रे, योगेश बाचल, समीर रुपदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी केवळ विकास दांगट यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती मिळाली. इतरांची माहिती शहरातील नेत्यांना विचारल्यानंतर त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भाजपला बंडखोरी शमवण्यात यश आले की अपयश आले, हे समजू शकले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) बैठकीत गोंधळ
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये निश्चित झालेल्या जागा वाटपाच्या सूत्राचे योग्य पालन झाले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. त्यावरून दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. या गोंधळावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मार्केट यार्ड येथील निसर्ग कार्यालयामध्ये बैठक बोलावली होती. मात्र, उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी गोंधळ घातल्याने बैठक गुंडाळण्यात आली.
Web Summary : Pune's PMC election sees alliance confusion spurring widespread rebellion across parties. Despite efforts, many disgruntled candidates remain defiant, impacting official nominees. Seat sharing disagreements worsened matters, creating candidate clashes.
Web Summary : पुणे पीएमसी चुनाव में गठबंधन भ्रम ने पार्टियों में व्यापक विद्रोह को बढ़ावा दिया। प्रयासों के बावजूद, कई असंतुष्ट उम्मीदवार अड़े रहे, जिससे आधिकारिक नामांकित व्यक्ति प्रभावित हुए। सीट बंटवारे की असहमति ने मामले को और खराब कर दिया, जिससे उम्मीदवार आपस में भिड़ गए।