अजबच..! मुळा नदी सुधार प्रकल्प सुरू झाला आणि आता सूचना-हरकतींचा फार्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 09:53 IST2025-03-28T09:51:35+5:302025-03-28T09:53:27+5:30
- सांगवी येथे बोलावले होते महाविद्यालयातील मुलांना : पर्यावरणवाद्यांनी प्रशासनास घेतले फैलावर

अजबच..! मुळा नदी सुधार प्रकल्प सुरू झाला आणि आता सूचना-हरकतींचा फार्स
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर असणाऱ्या मुळा नदीवर सुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पास पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर सूचना आणि हरकतींचा फार्स सुरू असल्याचे पर्यावरणवादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी सांगवीतील बैठकीत उघड केले. त्यांनी प्रशासनास फैलावर घेतले.
महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पातील चुकीच्या गोष्टींना शहरातील पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर महापालिकेच्या वतीने सूचना आणि हरकतींचा फार्स सुरू केला आहे, याविषयीची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी हा प्रकार पर्यावरणवादी संघटनांनी उघड केला.
सांगवी येथील प्रकल्पाच्या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयामध्ये दुपारी परिसरातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. प्रकल्पाचे सादरीकरण करून त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याचे नियोजन होते. याबाबतची माहिती पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर कार्यकर्ते धडकले. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले. प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता अर्ज कशासाठी, असे म्हणून धारेवर धरले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉमनिक लोबो, राष्ट्रवादीचे सागर चिंचवडे, बाबा भोईर, सूरज भोईर, मनसेचे राजू सावळे उपस्थित होते.
कशाला बोलावले, हेही सांगता आले नाही
निविदा निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आता आपण सूचना-हरकती घेऊन काय करणार, असा प्रश्न केला. त्यावेळी प्रशासनाने आम्ही विविध स्तरांतील नागरिकांच्या सूचना-हरकती घेऊन त्यांचा समावेश करून काही बदल करणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कशाला बोलावले, हेही सांगता आले नाही. मात्र, त्यांच्याकडून काही सूचना आणि हरकतींचे अर्ज भरून घेण्यात आले.
नदी सुधार प्रकल्प राबवताना पर्यावरणवादी संघटनांशी चर्चा करून हा प्रकल्प कशा पद्धतीने राबवायला हवा, त्याचबरोबर नदीकाठची जैवविविधता कशी कायम राहील, याविषयी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाच्या वतीने प्रकल्प दामटला जात आहे. आम्ही अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. - डॉमनिक लोबो, पर्यावरणवादी
नदी सुधार प्रकल्प राबवताना नागरिकांच्या सूचना, मते जाणून घेणे गरजेचे होते. मात्र, तसे प्रशासनाने केले नाही. आता प्रकल्प प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर सूचना घेतल्या जात आहेत. हा केवळ दिखाऊपणा आहे. - सागर चिंचवडे, चिंचवड
या प्रकल्पासाठी शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सूचना घेऊन सूचनांचा अंतर्भाव प्रकल्पात करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. त्यांना प्रकल्पाची माहिती दिली. - विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त