वायसीएम रुग्णालयात तीन एक्स-रे मशीन बंद; एकाच डिजिटल मशीनवर आहे धुरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:10 IST2025-11-01T15:10:28+5:302025-11-01T15:10:44+5:30
२०१९ पासून महापालिकेकडे एका मशीनची मागणी प्रलंबित

वायसीएम रुग्णालयात तीन एक्स-रे मशीन बंद; एकाच डिजिटल मशीनवर आहे धुरा
पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) पदव्युत्तर संस्था रुग्णालयात एक्स-रे विभागातील तीन ॲनालॉग एक्स-रे मशीन सुमारे २०१७ पासून बंद आहेत. त्यामुळे एकाच डिजिटल मशीनवर एक्स-रे काढले जात आहेत. रुग्णालय प्रशासनाने २०१९ पासून महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कारवाई झालेली नाही. सकाळच्या वेळी एक तास प्रतीक्षा करावी लागते.
केवळ एक डिजिटल रेडिओग्राफी (डीआर) मशीन २०१३ पासून कार्यरत आहे. आता आणखी किमान एका डीआर मशीनची तातडीची गरज आहे; अन्यथा सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. दररोज सरासरी ३०० रुग्णांचे ५०० एक्स-रे काढले जातात. मात्र, अपुऱ्या मशीनमुळे सकाळी मोठी रांग लागते, ज्यामुळे रुग्णांना अनावश्यक त्रास होतो. एक्स-रे विभागात २२ टेक्निशियन तीन शिफ्टमध्ये काम करतात. मात्र, मशीनची कमतरता असल्याने त्यांची मेहनत व्यर्थ जात आहे.
जुनी मशीन आणि विल्हेवाट
तीन जुन्या ॲनालॉग एक्स-रे मशीन तीन वर्षांपूर्वी डिसकार्ड करण्यात आल्या. मात्र, या मशीनची विल्हेवाट कशी लावावी, हा मोठा प्रश्न रुग्णालयासमोर उभा आहे.
५ पोर्टेबल मशीन
रुग्णालयात पाच पोर्टेबल मशीन (१०० एसए) उपलब्ध आहेत, ज्या आयसीयू किंवा वॉर्डमध्ये गंभीर रुग्णांसाठी वापरल्या जातात. मात्र, हे मुख्य विभागातील गर्दी कमी करण्यास अपुरे ठरत आहेत.
‘८०० एमए’ क्षमतेची डिजिटल एक्स-रे मशीनमध्ये आवश्यक ते बदल करून तिची क्षमता वाढवली आहे. मात्र, एका ‘१००० एमए’ क्षमतेच्या डिजिटल एक्स-रे मशीनची गरज आहे. त्याची मागणी २०२० मध्ये पहिल्यांदा करण्यात आली आहे. - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम पदव्युत्तर संस्था
बंद एक्स-रे मशीन समिती मार्फत निर्लेखित केल्या आहेत. त्यांची लवकरच विल्हेवाट लावण्यात येणार आहे. ‘वायसीएम’मध्ये ८०० एमए क्षमतेची डिजिटल एक्स-रे मशीनवर काम सुरळीत सुरु असून पोर्टेबल मशिनद्वारे आयसीयू व वॉर्डात जावून एक्स-रे काढले जातात. नवीन मशीनसाठी मागणी करण्यात आली आहे. - डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका