पिंपरी-चिंचवडकरांनो, गारेगार पीएमपी बसमधून घ्या ‘पुणे दर्शन’चा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:39 IST2025-10-28T13:57:07+5:302025-10-28T14:39:03+5:30
- भक्ती-शक्ती ते देहू-आळंदी पर्यटन आता केवळ ५०० रुपयांत : शहरातील अप्पू घर, इस्कॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर अशा प्रेक्षणीय, धार्मिक स्थळांचा समावेश

पिंपरी-चिंचवडकरांनो, गारेगार पीएमपी बसमधून घ्या ‘पुणे दर्शन’चा आनंद
पिंपरी :पुणे शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळांची सैर करण्यासाठी शहरातील पर्यटकांना आता ‘पीएमपी’ने पुणे दर्शनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे पर्यटकांना इलेक्ट्रिक वातानुकूलित बसमधून गारेगार प्रवास करत भटकंतीचा अनुभव घेता येईल.
शहर आणि जिल्ह्यातील १३ मार्गांवर ही बस धावणार असून, यातील तीन मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. शिवाय यात पर्यटकांना मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी, देहूगाव, गाथा मंदिर पाहण्याची संधी मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधील तीन मार्गांवर पुणे दर्शनची बस धावणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांना अत्यंत माफक दरात पुणे दर्शन होईल. पीएमपीच्या या पर्यटन बससेवेमुळे पिंपरी-चिंचवडमधील पर्यटकांची गैरसोय दूर होणार असून, शहर परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना पिंपरी-चिंचवडकरांना भेट देता येणार आहे.
‘पुणे दर्शन’ बसची काय आहे खासियत?
आरामदायक प्रवासासाठी पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित बस. प्रवासासाठी प्रति व्यक्ती केवळ ५०० रुपये इतका माफक दर. आठवड्याच्या प्रत्येक शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही बससेवा उपलब्ध असेल. तिकीट दरात प्रत्येक पर्यटनस्थळावर मार्गदर्शन आणि थांब्यांची व्यवस्था समाविष्ट आहे.
शहरातून जाणारे महत्त्वाचे मार्ग
मार्ग क्र. ८ : भक्ती-शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी, देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती-शक्ती निगडी.
मार्ग क्र. ११ : स्वारगेट, डेक्कन, एकविरा देवी मंदिर, कार्ला लेणी, लोणावळा, मनशक्ती ध्यान केंद्र, व्हॅक्स म्युझियम, स्वारगेट.
मार्ग क्र. १० : स्वारगेट, भोसरी, क्रांतिवीर हुतात्मा राजगुरू स्मारक, श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर (निमगाव दावडी), संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी.
तिकीट कुठे मिळणार?
शहरातील ज्या पहिल्या बसथांब्यावरून बस सुटणार आहे, तिथे तिकीट काढण्याची सोय असणार आहे. याशिवाय ‘आपली पीएमपीएमएल’ ॲपद्वारेही ऑनलाइन तिकीट मिळू शकते.
पीएमपीच्या इलेक्ट्रिक बससेवेमुळे हरित पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या माफक दरातील सेवेचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी घ्यावा. - किशोर चौहान, कामगार व जनता संपर्क अधिकारी