मनी लाँड्रिंगसाठी मोबाइल नंबरचा वापर झाल्याची बतावणी करत १४ लाखांना फसवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 20:54 IST2025-10-30T20:53:47+5:302025-10-30T20:54:30+5:30
टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करत तुमचा मोबाइल नंबर हा मनी लाँड्रिंग तसेच अन्य अवैध बाबींसाठी वापरल्याचे सांगितले.

मनी लाँड्रिंगसाठी मोबाइल नंबरचा वापर झाल्याची बतावणी करत १४ लाखांना फसवले
पुणे : टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करत तुमचा मोबाइल नंबर हा मनी लाँड्रिंग तसेच अवैध गोष्टींसाठी वापरला असल्याची बतावणी करत ५५ वर्षीय महिलेची १४ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी वडगाव शेरी येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला १२ सप्टेंबर रोजी सायबर चोरांनी संपर्क केला. टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करत तुमचा मोबाइल नंबर हा मनी लाँड्रिंग तसेच अन्य अवैध बाबींसाठी वापरल्याचे सांगितले.
तसेच, तुमच्या विरोधात तक्रार आल्याने तुमचा कॉल कुलाबा मुंबई पोलिस ठाण्याकडे फॉरवर्ड करत असल्याचे सांगून, पॅनकार्ड, आधारकार्डची मागणी केली. त्यानंतर अटक करण्याची भीती दाखवून महिलेच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यातील सर्व रक्कम ट्रान्सफर करावी लागेल, असे सांगत १४ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वाती खेडकर या करत आहेत.