यकृत प्रत्यारोपण चौकशीची आरोग्य यंत्रणांकडून टोलवाटोलवी सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 09:36 IST2025-11-04T09:36:47+5:302025-11-04T09:36:56+5:30
- सह्याद्री रुग्णालयातील दाम्पत्य मृत्यूप्रकरणी जबाबदारी ठरविण्यावरच प्रश्नचिन्ह

यकृत प्रत्यारोपण चौकशीची आरोग्य यंत्रणांकडून टोलवाटोलवी सुरूच
पुणे : सह्याद्री रुग्णालयात झालेल्या यकृत प्रत्यारोपणानंतर बापू आणि कामिनी कोमकर या दाम्पत्याचा मृत्यू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला असताना जबाबदारी निश्चित करण्याबाबत आरोग्य यंत्रणांकडून टोलवाटोलवी होत आहे. चौकशीची जबाबदारी असलेल्या राज्य आरोग्य विभाग आणि ससून रुग्णालयाने एकमेकांकडे जबाबदारी ढकलल्याने या गंभीर प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार का ? यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ऑगस्टमध्ये सह्याद्री रुग्णालयात बापू कोमकर यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला, तर यकृतदान करणाऱ्या त्यांच्या पत्नी कामिनी कोमकर यांचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला. कामिनी या पूर्णपणे निरोगी होत्या, त्यामुळे नातेवाइकांनी उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करीत डेक्कन पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर आरोग्य विभागाने तज्ज्ञांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती. चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. महंमद रेला यांच्या अध्यक्षतेखालील केईएम मुंबईचे डॉ. राम प्रभू, अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर, डॉ. विजय व्होरा, डॉ. आकाश शुक्ला, ससून रुग्णालयाचे डॉ. पद्मसिंह रणबागळे आणि आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या समितीने सह्याद्री रुग्णालयाला भेट देऊन तपासणी केली आणि सविस्तर अहवालही सादर केला. मात्र, या समितीने अंतिम निष्कर्ष न देता अहवाल राज्य आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला. त्यानंतर आरोग्य विभागानेही जबाबदारी निश्चित करण्याऐवजी अहवाल राज्य सल्लागार समितीकडे पाठवला आहे. दरम्यान, कोमकर दाम्पत्याच्या नातेवाइकांनी चौकशीतील विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ नसल्याचे कारण अनाकलनीय
डेक्कन पोलिसांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा तपास करण्यासाठी ससून रुग्णालयाला चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, ससून रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे कारण देत चौकशी करण्यास असमर्थता दर्शविली. हे प्रकरण दुसऱ्या रुग्णालयाकडे पाठवावे, अशी विनंती पोलिसांना केली. सूत्रांच्या माहितीनुसार, आता चौकशी मुंबईतील जेजे रुग्णालयाकडे सोपविण्याचा विचार सुरू आहे. पण, त्या रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ नसल्याने तपास कोण करणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. एखाद्या गुंतागुंतीच्या प्रकरणाच्या तपासणीसाठी बाहेरील तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करण्याची तरतूद असताना यंत्रणांकडून होणारी चालढकल संशयास्पद आहे, तर तज्ज्ञ उपलब्ध नसणे ही बाब सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारी आहे. एकीकडे खासगी रुग्णालये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक उपचार देत असताना एखाद्या विषयातील तज्ज्ञ उपलब्ध न होणे खेदजनक आहे.