थेरगाव बीआरटी, रहाटणी, काळेवाडी, वाकड परिसरामध्ये बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीला निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:52 IST2025-09-20T14:51:50+5:302025-09-20T14:52:11+5:30
- उभ्या बेवारस वाहनांमुळे नागरिकांची गैरसोय;औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने धावतात वेगाने, सकाळ, सायंकाळी वाहतूक कोंडी झाली नित्याची, कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नियुक्त करण्याची मागणी, चाकरमान्यांना रोज कामावर जाण्यास उशीर

थेरगाव बीआरटी, रहाटणी, काळेवाडी, वाकड परिसरामध्ये बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीला निमंत्रण
- महेश मंगवडे
वाकड - थेरगाव येथील औंध-रावेत बीआरटी रस्ता, काळेवाडी रहाटणी रस्ता, तापकीर चौक ते थेरगाव रस्ता, डांगे चौक ते चिंचवड रस्ता, डांगे चौक ते भूमकर चौक, वाकडमधील दत्त मंदिर रस्ता परिसरात रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांलगत उभ्या बेवारस वाहनांमुळे नागरिकांची गैरसोय होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने वेगाने धावतात. ज्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. विशेषतः वाकड पोलिस ठाणे ते डांगे चौक आणि वाकड रस्ता ते पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
परिसरातील रस्ते तसे प्रशस्त असले तरी बेवारस वाहने, अनधिकृत पार्किंग यामुळे वाहनचालक नेहमीच कोंडीत सापडतात. दुपारी शाळा सुटल्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. याबाबत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.
उपाय म्हणून सकाळ ते संध्याकाळपर्यंत वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, तसेच बेवारस वाहने, बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना द्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. चाकरमान्यांना वाहतुकीतील अडथळ्यांमुळे दररोज वेळेवर कामावर पोहोचणे कठीण जाते. सकाळ-संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. बस व रेल्वेसेवा उशिरा धावल्याने गैरसोय अधिक वाढते. यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे ही समस्या बनली आहे.
अधिकाऱ्यांनी पाहणी करून दिल्या सूचना
वाकड वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मधुकर थोरात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या चौकाची पाहणी करून संबंधित व्यावसायिक व नागरिकांना सूचना दिल्या आहेत.
अनधिकृत पार्किंगची ठिकाणे
एम्पायर ब्रिज ते कस्पटे वस्ती बीआरटी रस्ता, दोन्ही बाजूने.
जगताप डेअरी ते डांगे चौक बीआरटी रस्ता.
दत्त मंदिर रस्ता, वाकड.
भूमकर चौक ते बिर्ला हॉस्पिटल रस्ता.
तापकीर चौक ते थेरगाव गावठाण रस्ता.
वाहनचालक बेदरकारपणे वाहने पार्क करून सूचनांचे उल्लंघन करतात. वाहनचालकांनी सूचनांचे पालन करून व्यवस्थितपणे वाहने उभी करावी, जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होणार नाही. - नितीन सावंत, नागरिक
वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. निदर्शनास आणून देऊनही प्रशासन उपाययोजना करत नसल्याने उपमुख्यमंत्र्यांनाच निवेदन दिले आहे. - संतोष बारणे, माजी विरोधी पक्षनेते, महापालिका