पिंपरी-चिंचवड शहर वाहतूककोंडीत गुदमरतंय;नियोजनशून्य प्रशासनामुळे नागरी जीवन विस्कळीत
By विश्वास मोरे | Updated: July 31, 2025 12:31 IST2025-07-31T12:31:09+5:302025-07-31T12:31:32+5:30
महापालिका, पोलिस आणि राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण या तिन्ही संस्थांच्या अपयशामुळे शहरातला प्रवास आता वेळ आणि पैशांचा अपव्यय करणारा दैनंदिन त्रास झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर वाहतूककोंडीत गुदमरतंय;नियोजनशून्य प्रशासनामुळे नागरी जीवन विस्कळीत
पिंपरी : देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत सार्वजनिक वाहतुकीची अवस्था दयनीय आहे. नियोजनशून्य रस्ते विकास, अर्धवट सोडलेली पायाभूत कामे आणि बेजबाबदार प्रशासन यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. महापालिका, पोलिस आणि राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण या तिन्ही संस्थांच्या अपयशामुळे शहरातला प्रवास आता वेळ आणि पैशांचा अपव्यय करणारा दैनंदिन त्रास झाला आहे.
विकास नावाखाली रस्त्यांची कोंडी
बीआरटी मार्ग, ग्रेडसेपरेटर, पदपथ आणि मेट्रो प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते अडवले गेले असून, यामुळे शहरातील प्रमुख मार्ग अरुंद झाले आहेत. रस्ते सुशोभीकरणाच्या नावाखाली रुंद रस्त्यांचे ‘गाळे’ झाले आहेत. परिणामी अनेक मुख्य चौक आणि महामार्गांवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे.
सकाळ-संध्याकाळी शहर ठप्प
कामगार वर्गाच्या प्रवेश आणि निर्गमन वेळांमध्ये म्हणजे सकाळी ७ ते ९ वाजता आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत शहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांची रांग लागलेली दिसते. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असूनही या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
महत्त्वाचे रस्ते आणि पाहणीत आढळलेली स्थिती :
१) वाकड - किवळे महामार्ग :
सेवा रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मेट्रो आणि उड्डाणपुलामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
२) दापोडी - निगडी (जुना पुणे-मुंबई महामार्ग) :
ग्रेडसेपरेटर, मेट्रो आणि बीआरटी प्रकल्पांच्या अतिक्रमणामुळे रस्त्यांची चवचाल झालेली आहे. पाचशे कोटींच्या पदपथ सुशोभीकरणामुळे चौकात गंभीर कोंडी होते.
३) स्पाइन रोड (भोसरी - निगडी) :
रस्ता मोकळा असला, तरी सेवा रस्त्यांवर खासगी वाहनांची बेकायदेशीर पार्किंग व अतिक्रमण.
४) औंध - किवळे रस्ता :
जलद प्रवासासाठी पूल असले, तरी बीआरटी आणि सायकल मार्गांनी मुख्य रस्ता गिळंकृत केला आहे.
५) पिंपळे सौदागर - नाशिक फाटा मार्ग :
पदपथ आणि बीआरटी रेषांमुळे संध्याकाळच्या वेळेस मोठी वाहतूककोंडी जाणवते.
६) वाकड - डांगे चौक - चिंचवड स्टेशन मार्ग :
रस्ता सध्या प्रशस्त असला, तरी नव्याने उभारले जात असलेले पदपथ भविष्यातील कोंडीचे बीज ठरत आहेत.
७) आळंदी, मोशी, चिखली, तळवडे परिसर :
अवजड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग आणि पदपथांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोलमडते.
८) काळेवाडी फाटा - भोसरी - आळंदी रस्ता :
सायंकाळी वाहनचालकांना कोंडीत अडकून तिथून जाणे कठीण होते.
खासगी वाहनांचा स्फोट, सार्वजनिक वाहतूक ठप्प
पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी, चारचाकी, रिक्षा यांची संख्या १८.५ लाखांवर गेली आहे, तर लोकसंख्या ३० लाखांच्या वर. दरवर्षी दीड लाख नव्या वाहनांची नोंद होते. अंतर्गत भागांत सार्वजनिक वाहतूक अजूनही ढिसाळच आहे. मेट्रो आणि रेल्वे केवळ ठराविक भागापुरतीच मर्यादित आहे. परिणामी नागरिक खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत आणि त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतो आहे.
प्रशासन, प्राधिकरण आणि पोलिसांचा एकूणच झोपेचा कारभार
महत्त्वाचे रस्ते अरुंद करताना कुठलाही पर्यायी विचार केलेला नाही. अर्धवट प्रकल्प, रस्त्यांवरील अतिक्रमण, अनियंत्रित पार्किंग यामुळे शहर वाहतूककोंडीत गुदमरते आहे. या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी आणि प्रशासन केवळ घोषणा करण्यात धन्यता मानत आहे.
पिंपरी चिंचवड दृष्टीक्षेपात...
क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटर
लोकसंख्या : अंदाजे ३० लाख
शहरातील रस्ते : १८ मीटर ते ६१ मीटर
अंतर्गत मुख्य रस्त्यांची लांबी : ६३४ किलोमीटर
शहरातील एकूण कारखाने : २९७९
रेड, ऑरेंज आणि ग्रीन श्रेणीतील असे कारखाने : १९०२
पेट्रोल वाहने -७७ टक्के
डिझेल वाहने -१३ टक्के सीएनजी वाहने -१३ टक्के
इतर वाहने -दोन टक्के
दरवर्षी नवीन वाहनांची भर : दीड लाख वाहने
शहरातील एकूण वाहने : १८ लाख ५० हजार