बिबवेवाडी येथील टेकडीफोड करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:35 IST2025-05-14T12:34:17+5:302025-05-14T12:35:28+5:30

- अनधिकृत काम करणाऱ्यांविरुद्ध कडक भूमिका, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pimpri Chinchwad Action against those who desecrate the hill in Bibwewadi | बिबवेवाडी येथील टेकडीफोड करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

बिबवेवाडी येथील टेकडीफोड करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पुणे : शहरातील बिबवेवाडी येथील ५७९/१ ब सर्व्हे क्रमांकाच्या ठिकाणी असलेली टेकडी अनधिकृतपणे फोडणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने धडक कारवाई करत यंत्रे ताब्यात घेतली आहेत. यापुढे अनधिकृतपणे उत्खनन करुन पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

बिबवेवाडी येथे अनधिकृतपणे डोंगरफोड करून जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरु असल्याबाबतची माहिती प्रशासनाला मिळाली. याठिकाणी प्रशासनाच्या वतीने ड्रोनद्वारे स्थळ पाहणी करून पंचनामा केला. याठिकाणी अनधिकृत उत्खनन व डोंगरफोड करुन जागा सपाटीकरण होत असल्याचे निदर्शनास आले आणि प्रशासनाच्या वतीने ते तत्काळ थांबविण्यात आले.

याकामी वापरण्यात आलेले पोकलेन हुंडाई टू टेन ताब्यात घेण्यात आले आहे. या मिळकतीचे मालक राकेश शर्मा असून त्यांनी व विकासकाने उत्खनन तसेच जागा सपाटीकरण करिता जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे कार्यवाहीत निदर्शनास आले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या कारवाईत हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले,हवेली तहसीलदार किरण सूरवसे, मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्यवाही केली, अशी माहिती डुडी यांनी दिली.

Web Title: Pimpri Chinchwad Action against those who desecrate the hill in Bibwewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.