पिंपरवाडी होणार जुन्नरमधील पहिले 'नाचणी'चे गाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:05 IST2025-07-08T14:04:57+5:302025-07-08T14:05:45+5:30
नाचणीच्या एकूण १७ मूळ वाणाच्या बियाणांची पेरणी झाल्यामुळे भविष्यात नाचणीची बियाणे बँक तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

पिंपरवाडी होणार जुन्नरमधील पहिले 'नाचणी'चे गाव
जुन्नर :महाराष्ट्र फाउंडेशन, पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी भागातील पिंपरवाडी गावात पौष्टिक धान्य असलेल्या नाचणीच्या एकूण १७ मूळ वाणाच्या बियाणांची पेरणी झाल्यामुळे भविष्यात नाचणीची बियाणे बँक तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये नाचणी रोपवाटिका तयार करणे, नाचणीचे बियाणे संकलन करून नाचणी प्लॉट लावण्यासाठी महिलांना आणि शेतकऱ्यांना
नाचणी लागवडीसाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. संस्थेच्या माध्यमातून गावातील १७शेतकऱ्यांना दसर बेंद्री, पितर बेंद्री, दिवाळी बेंद्री, शीत मुटकी, दापोली, नागली लेट, जाबड स्थानिक, ढवळ पेरी, शिनपडी गिरवी आदी वाणाच्या बियाणांचे वाटप केले आहे. शेतकऱ्यांनी या बियाणांची मान्सूनच्या पूर्वसंध्येला पेरणी केलेली असून, सध्या ती बियाणे उतरून आली आहेत. एकाच गावात बियाणांची पेरणी झाल्यामुळे भविष्यात यामुळे गावामध्ये १७ प्रकारच्या नाचणीची बियाणे बँक तयार होणार आहे.
नाचणीचे आरोग्यदायी फायदे
नाचणीचे आहारातील अनेक फायदे आहेत. नाचणीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. नाचणी अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवते. लठ्ठपणा, हृदयविकार, ताणतणाव, मधुमेह कमी होण्यासदेखील नाचणी मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाचणी खूप फायदेशीर आहे. नाचणी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते तसेच वजन कमी करण्यासाठीदेखील आहारात नाचणीचा समावेश करावा. नाचणीमुळे लठ्ठपणा नियंत्रणात येतो.