अपघातात तिसरा बळी गेल्यावर प्रशासनाला आली जाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने केले तातडीने गतिरोधक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:44 IST2025-11-04T12:44:23+5:302025-11-04T12:44:32+5:30
- मागील आठवड्यातच या ठिकाणी दुचाकीच्या अपघातात तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या तर शनिवारी संध्याकाळी शंकर ढोबळे या युवकाचा अपघातात मृत्यू झाला.

अपघातात तिसरा बळी गेल्यावर प्रशासनाला आली जाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने केले तातडीने गतिरोधक
जुन्नर : जुन्नर शहरातून कबाडवाडी माणिकडोह गावाकडे जाणाऱ्या चौकात झालेल्या अपघातात शंकर ढोबळे यांचा मृत्यू झाल्यामुळे या चौकात चारही बाजूने मोठे गतिरोधक करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. या चौकात आतापर्यंत झालेल्या अपघातांत ३ जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मागील आठवड्यातच या ठिकाणी दुचाकीच्या अपघातात तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या तर शनिवारी संध्याकाळी शंकर ढोबळे या युवकाचा अपघातात मृत्यू झाला.
जुन्नर-ओतूर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमुळे पथदिव्यांचा प्रकाश त्या रस्त्यावर पडत नाही. परिणामी, हा रस्ता अंधारात राहतो आणि त्यामुळे अपघाताचे धोके वाढतात. जुन्नर नगरपालिकेने या ठिकाणी तातडीने पथदिवे लावण्याची मागणी केली आहे. कबाडवाडीचे सरपंच स्वाती कबाडी, अजिंक्य घोलप, माजी सरपंच माउली कबाडी, सरपंच ढोबळे, भिमाजी उतळे, राजूशेठ डुंबरे, मनीष बुट्टे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ढोबळे, युवक अध्यक्ष संदीप मुंढे, युवा सहकारी संकेत कबाडी, आत्माराम कबाडी, कृष्णा खोंड, संदीप पवार यांनी उपविभागीय अभियंता के. एम. जाधव यांच्याकडे या चौकातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी निवेदन दिले आहे. ग्रामस्थांनी या संदर्भात कार्यवाही न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घ्यावी लागणार असल्याचेही सांगितले आहे.