आरक्षण सोडत संपताच राजकारण तापले..! महापालिका रणधुमाळीला सुरुवात

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 14, 2025 15:43 IST2025-11-14T15:42:16+5:302025-11-14T15:43:45+5:30

- सर्वच पक्ष ‘तयारीत’, सत्ता हस्तगत करण्यासाठी दावे-प्रतिदावे सुरू

pimpari-chinchwad news politics heated up as soon as reservation was released..! Municipal strife begins | आरक्षण सोडत संपताच राजकारण तापले..! महापालिका रणधुमाळीला सुरुवात

आरक्षण सोडत संपताच राजकारण तापले..! महापालिका रणधुमाळीला सुरुवात

पिंपरी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, सोडतीनंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे करत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काही प्रभागांतील बदलामुळे थोडेफार गणित बदलले असले तरी प्रमुख पक्षांनी पर्यायी उमेदवार आधीच तयार ठेवले आहेत.

त्यामुळे आता उमेदवार जाहीर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपापासून ते महाविकास आघाडीपर्यंत, मनसेपासून आम आदमी पक्षापर्यंत सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीत झोकून देत आहेत. महायुती व महाविकास आघाडी या दोन्हीकडे चुरस रंगली आहे. आरक्षण सोडतीनंतर सर्वच पक्षांनी उमेदवारांची घोषणा करण्याची तयारी सुरू केली आहे. महायुतीत जागावाटपाची चर्चा होणार असताना महाविकास आघाडीतही एकजुटीचे प्रदर्शन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत यंदा ‘सत्ता कोणाच्या हाती?’ हा प्रश्न सर्वाधिक चर्चेचा ठरणार आहे.

आरक्षण सोडत भाजपाला अनुकूल आहे. पूर्वतयारी म्हणून आम्ही सर्व १२८ जागांवर सक्षम उमेदवार ठेवले आहेत. आम्ही १००च्या पुढे जागा जिंकणारच. महापालिकेचा महापौर भाजपाचाच होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी फरक पडणार नाही. - शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप

 

आम्ही ३२ प्रभागांमध्ये तयारी केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा महापालिकेवर फडकणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. - योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
 
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि महाविकास आघाडी जनतेच्या न्यायालयात जाण्यास तयार आहेत. जनतेच्या पाठिंब्याने आम्ही भाजपाला पराभूत करू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. - तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
 

प्रभाग रचना पूर्ववत असल्याने आमची तयारी आधीपासूनच सुरू होती. मनसेही सोबत आली आहे. त्यामुळे आमची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणुकीचा सामना करणार आहे. - संजोग वाघेरे, शहरप्रमुख, उद्धवसेना
 

सोडत पारदर्शक झाली असून, इच्छित प्रभागांवर योग्य आरक्षण मिळाले आहे. १५ नोव्हेंबरला पिंपरीत मेळावा घेऊन रणशिंग फुंकले जाईल. महायुतीत लढण्याची तयारी असून, भाजपाने सन्मानजनक जागा सोडाव्यात. - राजेश वाबळे, महानगरप्रमुख, शिंदेसेना
 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांनुसार इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. २५० हून अधिक अर्ज आले आहेत. नागरी प्रश्नांवर काँग्रेसच लढा देत आहे. - कैलास कदम, शहराध्यक्ष, काँग्रेस
 

सोडतीत फक्त किरकोळ बदल झाले आहेत. प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार तयार आहेत. युवकांना प्राधान्य दिले जाणार आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार स्वबळावर किंवा आघाडीसह लढण्याचा निर्णय होईल. - सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे
 

महायुतीत आम्ही भाजपासोबत असून, एससी-एसटीच्या १५ जागांवर आमचा दावा आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रणनीती आखली आहे. - कुणाल वाव्हळकर, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले)

दिल्ली आणि पंजाब मॉडेलवर आम्ही सर्व १२८ जागा लढणार आहोत. स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जागांवर उमेदवार जाहीर होणार आहेत. -  रविराज काळे, शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी

Web Title: pimpari-chinchwad news politics heated up as soon as reservation was released..! Municipal strife begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.