रहिवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत ‘क्लाऊड किचन’ची डोकेदुखी;रहिवाशांना त्रास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:04 IST2025-09-11T16:04:20+5:302025-09-11T16:04:40+5:30

- कारवाईबाबत नियमावलीचे कारण देत प्रशासनाची टोलवाटोलवी; कारवाईचे अधिकार नक्की कोणाकडे? जबाबदारी झटकण्याकडेच अधिकाऱ्यांचा कल

pimpari-chinchwad news headache of unauthorized cloud kitchen in residential societies; residents suffer | रहिवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत ‘क्लाऊड किचन’ची डोकेदुखी;रहिवाशांना त्रास 

रहिवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत ‘क्लाऊड किचन’ची डोकेदुखी;रहिवाशांना त्रास 

- प्रशांत होनमाने

पिंपरी : शहरातील रहिवासी सोसायट्यांमध्ये तसेच निवासी भागात ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी अनधिकृत सामूहिक स्वयंपाकघर (क्लाऊड किचन) सुरू आहेत. या व्यवसायामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका, पोलिस, अन्न व सुरक्षा विभाग यांच्याकडे तक्रारी करूनही कारवाई होत नाही. याबाबत कारवाईचे अधिकार आपल्याकडे नसल्याचे सांगत अधिकारी जबाबदारी झटकत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये शहरात ‘क्लाऊड किचन’ हा प्रकार उदयास आला आहे. विविध कंपन्यांच्या ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी क्लाऊड किचन तयार करण्यात आले आहेत. सुरुवातीला वस्तीपासून दूर हा व्यवसाय थाटला जात होता. मात्र, आता याला मिळणारा प्रतिसाद पाहता नागरी वस्तीमध्ये तसेच सोसायट्यांमध्येच तो थाटला जाऊ लागला आहे. अनेक ठिकाणी पहाटे चारपासून पुरवठा सुरू होतो. तो रात्री दोनपर्यंत सुरू असतो. किचनमधील भांडी आणि विविध उपकरणे आवाजाची मर्यादा ओलांडतात. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना याचा त्रास होत आहे.

अशी ही टोलवाटोलवी

सांगवी येथील क्लाऊड किचनबाबत रहिवाशांनी स्थानिक पोलिस ठाणे, महापालिका, अन्न व औषध प्रशासन, जिल्हाधिकारी आणि महापालिकेकडे वारंवार लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, महापालिकेने केवळ पाहणी करून नोटिसा दिल्या. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. अन्न व औषध प्रशासनाने आम्ही फक्त पाहणी करू शकतो, एवढेच सांगितले. आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही. या व्यवसायाची निश्चित वर्गवारी झालेली नाही. त्यामुळे या व्यवसायास नियमावली नाही.

 
कचरा, डासांचा उपद्रव

या क्लाऊड किचनमधून रोज तयार होणारा ओला कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरते, डासांची उत्पत्ती होते.
 

दिवसाला शंभरहून एन्ट्री

एका क्लाऊड किचनमधून दिवसाला सरासरी शंभरहून अधिक पार्सल नेली जातात. ती नेणाऱ्यांची नोंद नसते. याबाबत कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. अनेकदा पार्सल पोहोचवणाऱ्या व्यक्ती कोणतीही नोंद न करता सोसायटीत शिरतात. काहीजण तेथेच वाहनांवर बसून उघडपणे गुटखा खाणे, थुंकणे, मोठमोठ्याने बोलणे असे गैरवर्तन करतात. त्यामुळे परिसरातील महिला आणि मुलींना असुरक्षित वाटते आहे.

 
रस्ते बंद, पार्किंगचा त्रास

डिलिव्हरीसाठी येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आणि मुख्य रस्त्यांवर अडथळा निर्माण होतो. वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. रहिवाशांची वाहतूक अडते. आपत्कालीन वेळी एखादी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकणार नाही, अशी स्थिती दररोजच असते.

आमच्या घरासमोर नृसिंह हाऊसिंग सोसायटीच्या तळमजल्यावर क्लाऊड किचन सुरू आहे. या किचनच्या उपकरणांचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त असतो. त्याचा आवाज, घाणेरडा वास, वाहनांची वर्दळ, डासांचा उपद्रव यामुळे स्वास्थ्याचे, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यांच्या किचनच्या धुराने श्वसनाचेही आजार झाले आहेत. प्रशासनाने या क्लाऊड किचनवर त्वरित कारवाई करावी. - स्टीफन तिवडे, नागरिक, सांगवी. 

 

याबाबत महापालिकेकडे तक्रारी आल्या आहेत. सांगवी येथील क्लाऊड किचनचीही तक्रार आली आहे. संबंधिताला दोनदा नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे. यानंतर त्यांची तक्रार आली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - शेखर सिंह, आयुक्त, महापालिका.
 

क्लाऊड किचन किंवा तत्सम कोणत्याही व्यावसायिक आस्थापनेला परवानगी देण्याचा अधिकार आम्हाला नाही. याबाबत कारवाईचेही आदेश नाहीत. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार आल्यास कारवाई करू. - सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, अन्न प्रशासन विभाग, पुणे.

 

Web Title: pimpari-chinchwad news headache of unauthorized cloud kitchen in residential societies; residents suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.