पुणे महापालिकेच्या सभागृहातील भाषणात अटलजींच्या उदारमतवादी चेहऱ्याचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 19:28 IST2018-08-17T18:58:42+5:302018-08-17T19:28:32+5:30
तत्कालीन राजकीय परिस्थिती तणावाची होती. समाजातही अस्वस्थता नांदत होती. त्याचा अचूक संदर्भ वाजपेयी यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केलेल्या भाषणात दिला.

पुणे महापालिकेच्या सभागृहातील भाषणात अटलजींच्या उदारमतवादी चेहऱ्याचे दर्शन
पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात येत असतो.अटलबिहारी वाजपेयी यांना महापालिकेने सन १९८७ मध्ये असेच मानपत्र त्यांनी वक्तृत्वकलेला दिलेल्या योगदानाबद्धल दिले होते. त्यावेळी केलेल्या भाषणातून वाजपेयी यांनी आपल्या उदारमतवादाचे दर्शन श्रोत्यांना घडवले होते. त्याची आठवण आजही महापालिकेशी संबधित अनेकांना आहे.
तत्कालीन राजकीय परिस्थिती तणावाची होती. समाजातही अस्वस्थता नांदत होती. त्याचा अचूक संदर्भ वाजपेयी यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केलेल्या भाषणात दिला. मतांवर लक्ष ठेवून प्रत्येक कृती होत असल्याने देशातील समस्या वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ते म्हणाले ‘‘लोकशाही व्यवस्थेत मतभेद असलेच पाहिजेत, मात्र मनभेद होता कामा नये. राजकारण हे सेवेचे साधन आहे. सत्ता हीसुद्धा सेवेसाठी आहे व विरोधसुद्धा सेवा चांगली व्हावी यासाठीच असला पाहिजे. समान समस्या असतील त्यावेळी सर्वांनी एकत्र येत प्रश्नांचा सामना करायला हवा.’’ राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, मात्र राजकारणातील व्यक्तींचा गौरव करण्याऐवजी समाजावर परिणाम करणाऱ्या सांस्कृतिक, साहित्यिक, संगीत, अशा कलाक्षेत्रातील व्यक्तींचा गौरव महापालिकेने करावा अशी सुचनाही त्याच कार्यक्रमात वाजपेयी यांनी केली.
उल्हास बा. ढोले पाटील महापौर असताना हे मानपत्र देण्यात आले. प्रा. शंकरराव खरात, प्रा. रामकृष्ण मोरे असे विविध मान्यवर त्यावेळी सभागृहात उपस्थित होते. ते सगळेच वाजपेयींच्या भाषणाने प्रभावीत झाले होते. पालिकेने दिलेल्या मानपत्रामध्ये ‘अंधारात प्रकाश निर्माण करण्याचे, पिचलेल्या मनाला संजीवनी देण्याचे, दगडाला जाग आणण्याचे सामर्थ्य आपल्या वक्तृत्वात आहे’ अशा शब्दात त्यांच्या वाकपटुत्वाचा गौरव करण्यात आला होता.