ड्रोनद्वारे चित्रीकरणासाठी घ्यावी सात दिवस आधीच परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:03 IST2025-01-17T15:03:18+5:302025-01-17T15:03:46+5:30
दौंड, बारामती, शिरूर तालुक्यांच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी

ड्रोनद्वारे चित्रीकरणासाठी घ्यावी सात दिवस आधीच परवानगी
पुणे : जिल्ह्यात कोणत्याही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांना ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना आता सात दिवस आधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिकस्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरूर तालुक्यांच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करून इतर प्रकारच्या चोऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आदेशाचा भंग करून पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास भारतीय न्याय संहितेचे कलम २३३ प्रमाणे दंडनीय कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.