वारजे जलकेंद्राच्या निविदेत स्थायीची ‘चेन्नई’ एक्सप्रेस

By Admin | Updated: July 17, 2014 03:10 IST2014-07-17T03:10:55+5:302014-07-17T03:10:55+5:30

वारजे येथील जलशुध्दीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्तीची निविदा भरताना चेन्नई येथील एका कंपनीने महापालिकेच्या नियम व अटींची पुर्तता केली नाही.

Permanent 'Chennai Express' under the purview of Warje Water Works | वारजे जलकेंद्राच्या निविदेत स्थायीची ‘चेन्नई’ एक्सप्रेस

वारजे जलकेंद्राच्या निविदेत स्थायीची ‘चेन्नई’ एक्सप्रेस

पुणे : वारजे येथील जलशुध्दीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्तीची निविदा भरताना चेन्नई येथील एका कंपनीने महापालिकेच्या नियम व अटींची पुर्तता केली नाही. त्यामुळे महापालिकेच्या दक्षता विभागाने ही निविदा रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानंतरही पाणी पुरवठा विभागाने ही निविदा स्थायी समितीपुढे ऐनवेळी आणून मंगळवारी मान्य करून घेतली. त्यामुळे वारजे जलकेंद्राची ‘चेन्नई’ एक्सप्रेस स्थायी समितीत सुसाट धावली.
वारजे येथील जलशुध्दीकरण केंद्र दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी ३ वर्षे चालविण्याची निविदा काढण्यात आली होती. पाणी पुरवठा विभागाने काढलेल्या निविदेनुसार चेन्नई येथील व्ही. एस़ टेक वबांग व समर्थ इंजिनिअर्स अ‍ॅड कॉन्ट्रॅक्टर्स या दोन निविदा आॅनलाईन आल्या होत्या. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी निविदाचे ‘अ’ पाकीट २१ डिसेंबर २०१३ ला उघडण्यात आले. त्यावेळी चेन्नईच्या कंपनीची महापालिकेतील नोंदणी मुदत २ जुलै २०१३ ला संपल्याचे निदर्शनास आले. आॅनलाईन निविदा सादर केल्यानंतर पुन्हा कोणतेही कागदपत्रे सादर करता येत नाहीत. त्यामुळे दक्षता विभागाने ही निविदा रद्द करण्याची शिफारस केली.
दरम्यान, पाणी पुरवठा विभागातील काही अधिका-यांच्या आशिर्वादाने ऐनवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोंदणीचे प्रमाणपत्र निविदेत घुसविण्यात आले. त्यानंतर ही कंपनी पात्र होणार असल्याचे ग्रहित धरून ‘ब’ पाकीट जानेवारी २०१४ ला उघडण्यात आले. त्यानंतरच्या काळात संबंधित कंपनीला महापालिकेत नव्याने नोंदणी करण्याची ६ महिने मुभा देण्यात आली. त्यानुसार व्ही. एस़ टेक वबांग कंपनीने २७ जूनला महापालिकेची नोंदणी मिळविली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कार्यालयाच्या शिफारशीनुसार स्थायी समितीपुढे हा विषय मंगळवारी ठेवण्यात आला. त्यावर स्थायी समिती सदस्यांनीही त्याविषयीची सविस्तर माहिती न घेता निविदा तातडीने मान्य केली. परंतु, एका कंपनीसाठी महापालिका प्रशासनाने ऐनवेळी चक्रे फिरवून केलेल्या ‘चेन्नई’ एक्सप्रेसची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात जोरात सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Permanent 'Chennai Express' under the purview of Warje Water Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.