विशाल विकारी- लोणावळा : पावसाळी पर्यटनाची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या नवतरुण पर्यटकांमध्ये हुल्लडबाजांची संख्या वाढू लागल्याने पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा..जिवाला सावरा म्हणण्याची वेळ आली आहे.जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मागील दहा बारा दिवसांत मुंबई पुण्यासह मावळ तालुका व लोणावळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. मावळ तालुका हा पावसाळी पर्यटनाकरिता प्रसिद्ध आहे. यामधील लोणावळा व खंडाळा ही शहरे सध्या पावसाळी पर्यटनाची महत्त्वाची ठिकाणे बनली आहेत. याठिकाणी असलेले भुशी धरण, लायन्स पॉइंट, गिधाड तलाव धबधबा, सहारा पुलासमोर धबधबे, खंडाळ्यातील काचळदरीत कोसळणारा धबधबा, सनसेट व ड्युक्स नोज पॉइंट, ग्रामीण भागातील कार्ला, भाजे व बेडसे लेणी, लोहगड, विसापूर, तुंग व तिकोना किल्ला, पवना धरणाचा अथांग जलाशय व असंख्य धबधबे, हिरवेगार डोंगर, धुक्याची सर्वदूर पसरलेली चादर व ऊन पावसाचा लपंडाव हे सर्व सौंदर्य पाहण्याकरिता लाखोंच्या संख्येने पर्यटक लोणावळा व खंडाळा परिसरात येत आहेत. दुदैर्वाने यामध्ये हुल्लडबाजांचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिक नागरिकांसह कुटुंबासह पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांनादेखील या हुल्लडबाजीचा त्रास होऊ लागला आहे.
* आपत्कालीन मदतीसाठी क्रमांक
लोणावळा शहर पोलीस स्टेशन02114-273033लोणावळा नगर परिषद02114-273767शिवदुर्ग मित्र (रेस्कू पथक)9822500884 (सुनील गायकवाड - सचिव)सरकारी रुग्णवाहिका108
......................
* लोणावळ्यातील मद्याच्या दुकानांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त पावसाळी पर्यटन, मद्य सेवन व हुल्लडबाजी हे जणू युवा पिढीचे समीकरण बनले आहे. पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांमध्ये मद्यसेवन करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मुलीदेखील यामध्ये मागे नाहीत, लोणावळ्यातील मद्याच्या दुकानांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त पहायला मिळते. मावळ तालुका व लोणावळा, खंडाळा हा सर्व निसर्गसंपदेचे वरदान लाभलेला परिसर आहे. येथील निसर्गसौंदर्य पाहण्याकरिता कल्पक दृष्टीची आवश्यकता आहे. मात्र या निसर्गसंपदेचा आनंद घेण्याऐवजी स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे................हुल्लडबाजी नको, निसर्गाचा आनंद घ्या: बी. आर. पाटील पर्यटकांनीदेखील हुल्लडबाजी न करता येथील निख्खळ निर्सगसौंदर्याचा आनंद घ्यावा. येथील धरणे, धबधबे, डोंगर व दऱ्यांचा आनंद घेताना स्वत:च्या जीविताची काळजी घ्यावी. लोणावळा पोलिसांनी पर्यटकांना मार्गदर्शक ठरतील, अशा दहा प्रश्नांचे बोर्ड जागोजागी लावले आहेत. सोशल मीडियाचा वापर करत जनजागृती केली आहे. पर्यटकांनी हुल्लडबाजी न करता सुरक्षित पर्यटन केल्यास कोणतीच दुर्घटना घडणार नाही. पश्चाताप करण्यापेक्षा काळजी घेणे केव्हाही चांगले असा सल्ला लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिला आहे.