Omicron Variant: लोकहो ओमायक्रॉनला घाबरू नका; बरे झालेल्यांबरोबरच उपचार करणाऱ्यांचीही प्रकृती उत्तम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:12 IST2021-12-22T16:11:58+5:302021-12-22T16:12:09+5:30
नागरिकांनी घाबरून न जाता पुरेसी काळजी घेणे आवश्यक आहे

Omicron Variant: लोकहो ओमायक्रॉनला घाबरू नका; बरे झालेल्यांबरोबरच उपचार करणाऱ्यांचीही प्रकृती उत्तम
पिंपरी : ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा तीनपट अधिक वेगाने पसरण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यातच शहरात आतापर्यंत ओमायक्रॉनचे पिंपरीत अकरा रुग्ण आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण होते. महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालयात या रुग्णांवरती उपचार करण्यात आले होते. सद्यस्थितीत तरी ओमायक्रॉन रुग्णांमुळे या दोन्ही रुग्णालयांतील एकाही कर्मचाऱ्याला ओमायक्रॉनची लागण झालेली नाही. तसेच सद्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणावर ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पुरेसी काळजी घेणे आवश्यक आहे.
जगातील ७७ देशांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला. हा विषाणू डेल्टा विषाणूपेक्षाही जास्त वेगाने पसरत असल्याची परदेशात दिसून आले आहे. शहरात परदेशातून आलेले तीन जण आणि त्यांच्या संपर्कातील तीन अशा सहा रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याचा अहवाल ५ डिसेंबरला आला होता. परिणामी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात आतापर्यंत ओमायक्रॉनचे अकरा रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत ओमायक्रॉन विषाणूचा एकच सक्रिय रुग्ण आहे. तर दहा रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडले आहे.
१) शहरात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांना कोणताही लक्षणे नव्हती.
२) विशेष म्हणजे या रुग्णांना एक्सरे किंवा सिटीस्कॅन काढण्याची गरज लागलेली नाही.
३) कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ज्या पद्धतीने उपचार दिले जातात, त्याच पद्धतीने उपचार
''ओमायक्रॉनच्या रुग्णांना उपचार देताना रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घेऊनच उपचार केले आहे. कर्मचाऱ्यांनी पीपीई कीटचा वापर केला. या सर्व रुग्णांना कोणताही लक्षणे नव्हती. त्यामुळे दहा रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात ओमायक्रॉनचा एकच रुग्ण आहे. त्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे पिंपरी महापालिका वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.''