Pimpri Chinchwad: हिंडवडीत डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 20:25 IST2023-07-14T20:24:06+5:302023-07-14T20:25:01+5:30
डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...

Pimpri Chinchwad: हिंडवडीत डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने पादचारी व्यक्तीला धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १२) सकाळी दहाच्या सुमारास हिंजवडी येथे साखरे वस्ती रोडवर घडली.
घनश्याम महेशप्रसाद उके असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी घनश्याम यांच्या पत्नीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती घनश्याम उके आणि तेजचंद सुखदेव उके हे दोघे जण ते काम करत असलेल्या गार्डनकडे पायी जात होते. साखरे वस्ती रोडवरील आमीन सेंटर दुकानाजवळ त्यांना भरधाव वेगात जाणाऱ्या एका डंपरने धडक दिली. त्यामध्ये घनश्याम हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सुरुवातीला औंध हॉस्पिटल आणि नंतर ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर डंपरचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.