कोथरुड पोलिसांच्या अथक प्रयत्नाने रुग्णांना मिळाले जीवदान; अवघ्या तासाभरात केला ऑक्सिजनचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 12:30 IST2021-05-02T12:25:17+5:302021-05-02T12:30:17+5:30
खासगी रुग्णालयात संपला होता ऑक्सिजनचा साठा

कोथरुड पोलिसांच्या अथक प्रयत्नाने रुग्णांना मिळाले जीवदान; अवघ्या तासाभरात केला ऑक्सिजनचा पुरवठा
पुणे: पौड रस्त्यावरील कृष्णा हॉस्पिटलमध्ये २० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. येथील ऑक्सिजन संपत आला होता, ही आणिबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन कोथरुड पोलिसांनी रुग्णालयांशी संपर्क साधून एका तासाभरात ऑक्सिजनचे ४ जम्बो सिलेंडर उपलब्ध करुन दिले. त्यामुळे ऑक्सिजनअभावी कंठाशी प्राण आलेल्या २० रुग्णांना जीवदान मिळू शकले.
कृष्णा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मेघश्याम डांगे यांना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता फोनवरुन माहिती देण्यात आली. त्यात रुग्णालयातील २० रुग्ण ऑक्सिजनवर असून त्यांचा ऑक्सिजनचा साठा संपला असून केवळ ३० ते ४५ मिनिटे पुरेल, इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. कोठेही जागा नसल्याने रुग्णांना हलविणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. ही आणिबाणीची स्थिती लक्षात घेऊन कोथरुड पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार कोथरुड परिसरातील सर्व हॉस्पिटलशी संपर्क साधू लागले. त्यात सूर्यप्रभा रुग्णालय व सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून ऑक्सिजन मिळू शकेल, असे दिसून आले. त्याबरोबर पोलिसांनी तातडीने क्रेन व शिवाजीनगर येथून ड्युरा सिलेंडर आणण्याकरीता वाहन उपलब्ध करुन देण्यात आले. या वाहनांना पोलीस एक्सॉर्ट व पायलेटिंग करुन केवळ १ तासाच्या आत हे ऑक्सिजन सिलेंडर कृष्णा हॉस्पिटलमध्ये पोहचवले. त्यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये होणार्या संभाव्य दुर्घटनेपासून रुग्णांचा बचाव करता आला.
पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली व सह्याद्री व सूर्यप्रभा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे कोथरुड पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली.