प्रवाशांनो सावधान! पुण्यात रिक्षाचालकांचा खोडसाळपणा; ५० रुपयांच्या प्रवासासाठी मोजावे लागतात १००
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:08 IST2025-01-02T18:08:17+5:302025-01-02T18:08:57+5:30
काही रिक्षांच्या मीटरमध्ये अवास्तव वाढ होत असल्याचे लक्षात आल्यास रिक्षाचालकांना विचारणा केली जाते, तेव्हा ते टाळाटाळ किंवा दुर्लक्ष करतात

प्रवाशांनो सावधान! पुण्यात रिक्षाचालकांचा खोडसाळपणा; ५० रुपयांच्या प्रवासासाठी मोजावे लागतात १००
पुणे : प्रवाशांना निश्चित ठिकाणी वेळेवर पोहाेचविण्यासाठी रिक्षाला प्राधान्य दिले जाते; परंतु काही रिक्षाचालक मीटरमधील वायरमध्ये (मीटर टेम्परिंग) खोडसाळपणा करून मीटरचे स्पीड वाढविण्यात येत आहे. त्यामुळे ५० रुपयांच्या प्रवासासाठी ७० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत. शहरातील काही रिक्षांमध्ये चुकीच्या प्रकारे मीटर सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक भाडे भरावे लागते.
नियमांनुसार २५ रुपये प्रतिकिलोमीटर रिक्षा भाडे आकारले जाते; तसेच रिक्षा सिग्नलवर उभी राहिली असताना मीटरमध्ये कोणताही आकडा वाढत नाही; परंतु काही रिक्षांच्या मीटरमध्ये दर वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे, असे प्रवाशांकडून सांगण्यात आले आहे. नेहमीच्या प्रवासात ठराविक भाडे मोजावे लागते; मात्र काही रिक्षांच्या मीटरमध्ये अवास्तव वाढ होत असल्याचे लक्षात आले आहे. जेव्हा रिक्षाचालकांना यासंबंधात विचारणा केली जाते, तेव्हा टाळाटाळ, दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा प्रकारे चुकीच्या आणि खोडसाळपणा करणाऱ्या रिक्षाचालकांवर आरटीओकडून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
अशा वेळी प्रवाशांनी हे करावे...
- ऑटोचालकावर कार्यवाही करणे.
- ऑटो मीटरवर ऑन दी स्पॉट तपासणी करायला लावणे.
- प्रवासादरम्यान मीटरच्या आकडेवारीचे निरीक्षण करणे.
- प्रवासाचे अंतर व भाड्याची तुलना करणे.
- प्रवाशांच्या पुराव्यासाठी मीटरची छायाचित्र गोळा करणे.
मी दररोज मोशी ते भोसरीदरम्यान प्रवास करते. साधारणपणे ५० रुपये भाडे देते; परंतु मला मंगळवारी मला १२० रुपये द्यावे लागले. रिक्षाचालकाच्या चुकीमुळे मला ७० रुपये जास्तीचे मोजावे लागले. - नेहा वाघ, प्रवासी
प्रवाशांनी जागरूक राहून फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या पाहिजेत. चुकीच्या मीटरचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तांत्रिक सुधारणा आणि कठोर नियम लागू करणं गरजेचं आहे. - स्मिता अहिरे, प्रवासी
ऑटो मीटरमधील गैरप्रकारांवर कठोर कारवाई हे आमचे प्राधान्य आहे. नागरिकांनी तक्रारी नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे. मीटरमध्ये घोटाळा आढळत असेल तर त्वरित त्याचा फोटो काढून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर पाठवावे किंवा कॉल करून त्याबद्दलची माहिती द्यावी. - विष्णू घोडे, आरटीओ अधिकारी
कुठल्याही प्रकारच्या मीटर टेम्परिंग किंवा महिलांशी छेडछाड होणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई केली जाईल. तुम्हाला अशा कोणत्याही घटनेचा सामना करावा लागला तर, कृपया ११२ (हेल्पलाइन) किंवा १०९१ (महिला हेल्पलाइन) नंबरवर तक्रार नोंदवा. आमच्यातर्फे त्वरित कार्यवाही केली जाईल. सुरक्षा आणि न्यायासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. - शफिक पटेल, आझाद रिक्षा संघटना
येथे करा तक्रार
रिक्षाचालक, संबंधित कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवायची असेल तर ११२ या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा किंवा रिक्षाचालकांनी महिलांसोबत कुठल्याही प्रकारची गैरवर्तन केलेस १०९१ या क्रमांकावर कॉल करा.