प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; सुप्रिया सुळेंनी दाखवला पुण्यातील रस्त्यातला खड्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 13:29 IST2023-10-25T12:53:48+5:302023-10-25T13:29:11+5:30
पुण्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठा खड्डा पडला असून तो खड्डा अपघाताला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे.

प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; सुप्रिया सुळेंनी दाखवला पुण्यातील रस्त्यातला खड्डा
राष्ट्रीय महामार्ग असो, राज्य महामार्ग असो किंवा गावखेड्यातील रस्ते असो, रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्न कायमच असतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने सातत्यानो ओरड होत असते. सरकार बदलल्यानंतर अनेकदा या खात्याचे मंत्रीही बदलले जातात. मात्र, रस्त्यांची दुर्दशा कायमच असते. गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यावर असेलल्या खड्ड्यांचा प्रश्न गणेशभक्तांमुळे समोर आला होता. त्यानंतर, राज्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या आणि खड्ड्यांच्या समस्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांना ते सहन करावे लागते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा प्रश्न उपस्थित केला आहे.
पुण्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठा खड्डा पडला असून तो खड्डा अपघाताला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे. एकदम गुळगुळीत रस्त्यावरील या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासह संबंधित विभागाला आपल्या ट्विटमध्ये मेंशन केलं आहे. ''चांदनी चौकातील एनडीएपासून मुळशीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावर हा असा खड्डा पडला आहे. 'एनएचएआय'ने हे काम तपासून पाहण्याची गरज आहे. या रस्त्याचे उद्घाटन होऊन अद्याप वर्ष देखील उलटले नाही, तोवर हि स्थिती झाली. रस्त्याच्या या अशा कामामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. ही अतिशय गंभीर व खेदजनक बाब आहे,'' असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
चांदनी चौकातून एनडीए पासून मुळशीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावर हा असा खड्डा पडला आहे. 'एनएचएआय'ने हे काम तपासून पाहण्याची गरज आहे. या रस्त्याचे उद्घाटन होऊन अद्याप वर्ष देखील उलटले नाही तोवर हि स्थिती झाली. रस्त्याच्या या अशा कामामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. हि… pic.twitter.com/EUKDgktRhl
— Supriya Sule (@supriya_sule) October 25, 2023
खासदार सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून रस्त्यावरी खड्ड्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. मात्र, हा प्रश्न केवळ पुण्यातील खड्ड्याचा नसून राज्यातील अनेक जिल्ह्यात अशाप्रकारे प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे अपघातांची घटनांमध्ये वाढ होत आहे.