प्रवाशांची गैरसोय..! पीएमपी बस बंद असल्याने फेऱ्यांवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:30 IST2025-11-05T12:30:20+5:302025-11-05T12:30:38+5:30
चालक व वाहकांना बस मिळत नसल्यामुळे माघारी जावे लागत आहे. शिवाय बस बंद असल्यामुळे फेऱ्यांवर परिणाम होत असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे.

प्रवाशांची गैरसोय..! पीएमपी बस बंद असल्याने फेऱ्यांवर परिणाम
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) देखभाल-दुरुस्तीअभावी स्वमालकीच्या १०० पेक्षा जास्त बस आहेत. त्यामुळे कामावर आलेल्या चालक व वाहकांना बस मिळत नसल्यामुळे माघारी जावे लागत आहे. शिवाय बस बंद असल्यामुळे फेऱ्यांवर परिणाम होत असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे पीएमपी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. सध्या पीएमपीच्या ताफ्यात दोन हजारांहून अधिक बस आहेत. त्यामध्ये पीएमपीच्या मालकीच्या बसची संख्या सातशेच्या जवळ आहे. त्यापैकी किमान १०० बस देखभाल-दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या फेऱ्यांवर परिणाम होत आहे. तसेच सुरू असलेल्या बस रस्त्यावर बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत.
स्वारगेट आगारातील तर दररोज निम्म्या बस बंद ठेवल्या जात आहेत. त्यामुळे कामावर आलेले चालक व वाहकांना परत पाठविण्यात येत आहे. त्यांना जबदरस्तीने सुट्टी घेण्यास सांगून त्यांच्या वर्षाच्या सुट्ट्यांतील कोट्यामधून त्या कमी केल्या जात आहेत. तर, दुसरीकडे रस्त्यावरील फेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना थांब्यावर बराच वेळ थांबावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार सुरू आहेत. पण, पीएमपी प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांचे हाल होत असताना पीएमपी प्रशासनाकडून हा प्रश्न कधी सोडवला जाणार, असा प्रश्न विचारला जात आहे.