खेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या वेदना पक्षनेतृत्वाने समजून घेण्याची गरज - दिलीप मोहिते-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:43 IST2025-11-01T14:43:00+5:302025-11-01T14:43:47+5:30
- कार्यकर्ता मेळाव्यात स्वपक्षालाच मोहिते-पाटलांचा घरचा आहेर

खेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या वेदना पक्षनेतृत्वाने समजून घेण्याची गरज - दिलीप मोहिते-पाटील
चाकण : खेड तालुक्यात एमआयडीसी, महामार्ग, रिंग रोड, रेल्वे प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे. पक्षनेतृत्वाने त्यांच्या वेदना समजून घेण्याची गरज आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. मात्र मी त्यांच्यासाठी कायम उभा राहणार आहे. तालुक्यातील जनता हीच माझी खरी मोठी ताकद आहे, असे वक्तव्य माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी स्वपक्षाला घरचा आहेर देत केले आहे.
चाकण ( ता. खेड ) येथे (दि. ३०) ला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मोहिते-पाटील बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, सुरेखा मोहिते, कमल कड, कैलास सांडभोर, अनिलबाबा राक्षे, गणेश बोत्रे, अरुण चांभारे, विनायक घुमटकर, नवनाथ होले, नीलेश थिगळे, आशिष येळवंडे, राम गोरे, मोबीन काझी, आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिते पाटील पुढे म्हणाले की, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी दिवसरात्र कष्ट केले, अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी चोवीस तास कायम उभा आहे. निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी माझी साथ कार्यकर्त्यांना मिळणारच. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. आयतांनी आमच्याकडे संधी नाही; तसेच ज्यांना दुसरीकडे जायचं आहे, त्यांनी खुशाल जावे. असल्या फितुरांची पक्षाला गरज नाही.
वीस वर्षे ज्यांच्याविरोधात काम केले त्यांचा प्रचार आम्हाला करावा लागल्याची खंत व्यक्त करत मोहिते-पाटील म्हणाले की, वीस वर्षे मंत्रिपदावर राहून पक्षासाठी काय केलं आहे सर्वांना माहीत आहे. माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नावे न घेता त्यांनी घणाघात केला.
चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगरपरिषदेसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती करणार असल्याचे सांगत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपची तयारी असेल तर युती करू अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले.