पुणेकरांना दिलासा : शहरातील उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून होणार खुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 18:02 IST2020-10-26T18:01:22+5:302020-10-26T18:02:47+5:30
गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी महापालिका प्रशासनाला उत्तम सहकार्य केले.

पुणेकरांना दिलासा : शहरातील उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून होणार खुली
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली शहरातील उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली केली जाणार आहेत. पालिका याबाबतचे आदेश काढणार असून नागरिकांना ताळेबंदी उठविण्याच्या प्रक्रियेत आणखी एक दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 'लॉकडाऊन' घोषित करण्यात आला होता. त्यानंतर, राज्य शासनाच्या आदेशानुसार पालिकेनेही संपूर्ण टाळेबंदी केली होती. कोरोना रूग्णांची संख्या आता घटू लागली असून शहरातील परिस्थिती आटोक्यात येऊ लागली आहे. यापूर्वीच महापालिकेने दुकाने, हॉटेल्स, बार-रेस्टॉरंट, ग्रंथालये, विपश्यना केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मागील आठवड्यात हॉटेल्स आणि बार-रेस्टॉरंट यांना रात्री साडे अकरापर्यंत परवानगी दिली आहे. शहरातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याने आता उद्याने सुरू करण्याची मागणी होत आहे.
ही उद्याने सुरू करण्याबाबत पालिका सकारात्मक असून याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
नागरिकांना सकाळी फिरण्यासाठी तसेच लहान मुलांसह सर्वानाच उद्यानात जाता यावे याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. परवानगी देण्यात आली असली तरी अटी आणि शर्तींच्या आधारावर उद्याने खुली केली जाणार आहेत.
------
गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी महापालिका प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे काही नियम घालून उद्याने सुरु करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. ते नियम तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्याने उद्यानात पुणेकरांनी योग्य काळजी घ्यावी. - मुरलीधर मोहोळ, महापौर