बदलीचा कागदोपत्री खेळ, प्रभारी पदावर पवारांचा मेळ
By दीपक होमकर | Updated: June 14, 2025 14:06 IST2025-06-14T12:46:04+5:302025-06-14T14:06:57+5:30
- ४ जणांच्या बदल्या, तिघांच्या जागी नवे अधिकारी; पवारांना पुन्हा तीच जबाबदारी कुणामुळे?

बदलीचा कागदोपत्री खेळ, प्रभारी पदावर पवारांचा मेळ
पुणे :आरोग्य विभागाचे उपसंचलाक डॉ. राधाकिशन पवार यांच्याविरोधात अनेक लेखी आरोप झाल्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी प्रशासकीय कारणास्तवत्यांच्या बदलीचे आदेश काढले होते खरे मात्र आयुक्तांकडून पुन्हा त्यांच्याकडेच प्रभारी पद दिल्यामुळे उपसंचालक पवार हे त्याच खुर्चीवर आहेत. त्यामुळे बदली करूनही प्रशासनाने मंत्र्यांनाच ठेंगा दाखविल्याचे उघड झाले आहे.
औषध खरेदी प्रकरण, बदल्या-प्रतिनियुक्त्या आणि भरतीमध्ये गैरव्यवहार, आरोग्याधिकारी पदासाठी पात्रता नसताना त्या पदासाठी शिफारस अशा प्रकारचे विविध आरोप पुणे मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्यावर झाले होते. त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या आदेशानुसार प्रशासकीय कारणास्तव डॉ. पवार यांची बदलीचे आदेश काढले.
त्यानुसार ६ जून रोजी मंत्रालयातील अवर सचिव गायकवाड यांनी बदलीचा आदेश जारी केला. मात्र त्यांच्या जागी दुसरा सक्षम अधिकारी नेमला गेला नसल्याने हे पद त्यांच्याकडे प्रभारी म्हणून देण्यात आले. त्याबाबतचे आदेश आयुक्त अमगोथू श्री रंगा नाइक यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का त्याबबात आरोग्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
चौघांच्या बदलीत पवार यांनाच झुकते माप का?
आरोग्यमंत्र्यांकडून डॉ. गोविंद चौधरी, डॉ. विजय बाविस्कर, बिबाता कमलापुरे यांच्यासह उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार अशा चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली होती, तसा आदेश जारी करण्यात आला होता. आदेशानुसार डॉ. चौधी यांचा पदभार डॉ. संजीवकुमास जाधव यांच्याकडे, डॉ. बाविसस्कर यांचा पदभार डॉ. सुनिता गोल्हाईत आणि डॉ. कमलापुरे यांचा पदभार डॉ. संदीप सांगळे यांच्याकडे दिला आहे. केवळ डॉ. राधाकिशन पवार यांच्या पदावर इतर कोणत्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली नाही.