Pune Crime: खडकीत सराईत गुंडांची कोयता घेऊन दहशत; गाड्यांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 17:37 IST2023-07-19T17:35:02+5:302023-07-19T17:37:06+5:30
यातील चार आरोपी अल्पवयीन आहेत...

Pune Crime: खडकीत सराईत गुंडांची कोयता घेऊन दहशत; गाड्यांची तोडफोड
- किरण शिंदे
पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सराईत गुंडांकडून वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. सहकारनगर, भारती विद्यापीठ पाठोपाठ आता खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांनी कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने वाहनांची तोडफोड केली. औंध रस्त्यावरील वीर भगतसिंग चौकात 16 जुलैच्या रात्री हा प्रकार घडला.
याप्रकरणी आदित्य भारती शेडगे (वय 20), तेजस उर्फ बलमा गायकवाड यांच्यासह 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 4 आरोपी अल्पवयीन आहेत. ओंकार युवराज सोकटे (वय 25) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, खडकी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास कोयत्याने आणि दांडक्याने पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड केली. तर पडवळ वस्तीतील नागरिकांच्या घराच्या बाहेरून कड्या लावल्या. हातातील हत्यारे हवेत उंचावून आरोपींनी आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागल्यास एकेकाला बघून घेऊ असे म्हणत दहशत निर्माण केली. खडकी पोलिस अधिक तपास करत आहेत.