काश्मीर मधील पर्यटकांना महाराष्ट्रात सुरक्षित आणा - अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:45 IST2025-04-25T09:41:45+5:302025-04-25T09:45:10+5:30
पहेलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर श्रीनगर, पुलवामासह काश्मीरमध्ये विविध ठिकाणी पर्यटक अडकून पडले

काश्मीर मधील पर्यटकांना महाराष्ट्रात सुरक्षित आणा - अमोल कोल्हे
नारायणगाव : पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर काश्मीरच्या विविध भागांत अडकून पडलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटकांना सुरक्षित महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्राद्वारे केली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड व हवेली तालुक्यातील अनेक पर्यटक काश्मीरला पर्यटनासाठी गेले आहेत. काल पहेलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर श्रीनगर, पुलवामासह काश्मीरमध्ये विविध ठिकाणी पर्यटक अडकून पडले आहेत. मात्र अतिरेकी हल्ल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून दुकाने, वाहतूक आदी पूर्णतः बंद केली आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांना विमानतळ, रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचता आले नाही. परिणामी पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवेली आणि खेड तालुक्यातील पर्यटकांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी पर्यटकांशी मोबाइल कॉल करुन चर्चा करीत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर श्रीनगरच्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून पर्यटकांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र पाठवून काश्मीरमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटकांना सुरक्षित महाराष्ट्रात परत येण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील पर्यटकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य असून त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे स्पष्ट करीत त्यांच्या नातेवाइकांना आश्वस्त केले.