'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 16:42 IST2021-12-25T16:41:30+5:302021-12-25T16:42:47+5:30

देशासह जगभरातील प्राध्यापक या संस्थेला भेट देण्यासाठी पुण्यात येतील. आज शिक्षण पद्धतीत केले जाणार बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता येत्या काळात ऑक्सफर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल

Oxford will be known as 'Pune of West', aditya thackarey in pune | 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल'

'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल'

ठळक मुद्देनव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढविण्यावर भर देण्यात यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

पुणे - शिक्षक हे आजच्या काळातील तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाप्रमाणे त्यांनाही अद्ययावत करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रशिक्षण महत्वाचे आहे. पुढची पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. नवा देश, नवी पिढी घडविण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण महत्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून असे कार्य होईल आणि त्यातून देशाला नवी दिशा दिली जाईल, असे मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  

देशासह जगभरातील प्राध्यापक या संस्थेला भेट देण्यासाठी पुण्यात येतील. आज शिक्षण पद्धतीत केले जाणार बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता येत्या काळात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढविण्यावर भर देण्यात यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

प्रास्ताविकात संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यांनी संस्थेची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षकांचे प्रशिक्षण हे महत्वाचे अंग आहे. राज्यातील ४ हजारपेक्षा अधिक महाविद्यालये आणि दीड हजार तंत्र शिक्षण महाविद्यालयातील सुमारे १ लाख प्राध्यापकाना प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील सर्व विद्यापीठ संस्थेचे उपकेंद्र रहातील आणि त्याद्वारे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

मान्यवरांच्या हस्ते जे.जे. महाविद्यालयाने तयार केलेल्या संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्ह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. गडचिरोली येथील युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या नागपूर येथील ज्ञान फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अजिंक्य कोटावार यांना पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या हस्ते 'यंग सोशल इनोव्हेटर' म्हणून गौरविण्यात आले. 

दरम्यान, कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, संचालक उच्च व तंत्रशिक्षण विभाग डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ, तंत्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ.विनोद मोहितकर, विद्यापीठातील अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आदी उपस्थित होते. 

Web Title: Oxford will be known as 'Pune of West', aditya thackarey in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.