आमचा उमेदवारही तोडीस तोड देणारा असणार; काँग्रेस कसब्याप्रमाणेच विजय मिळवणार - नाना पटोलेंचा विश्वास
By राजू इनामदार | Updated: March 14, 2024 19:05 IST2024-03-14T19:04:37+5:302024-03-14T19:05:09+5:30
कसबा पोटनिवडणुकीत सगळेच आम्हाला कमजोर समजत होते, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एकटाच इथे काँग्रेसचा झेंडा लागणार हे सांगत होतो

आमचा उमेदवारही तोडीस तोड देणारा असणार; काँग्रेस कसब्याप्रमाणेच विजय मिळवणार - नाना पटोलेंचा विश्वास
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडीच घेतली होती. पण, जिंकलो आम्हीच. लोकसभा निवडणुकीतही तेच होणार, आमचा उमेदवार त्यांच्या तोडीस तोड तर असेल. पण, तोच काँग्रेसला कसब्याप्रमाणेच विजय देखील मिळवून देईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’ बरोबर बोलताना व्यक्त केला. लवकरच आमचा उमेदवार जाहीर होईल, असे ते म्हणाले.
मूळचे पैलवान असलेल्या पटोले यांनी पैलवानी भाषेतच पुण्यातील लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवाराने म्हणे कोल्हापुरात काही काळ तालीमही केली आहे, अशी सुरूवात करून पटोले म्हणाले, “त्यामुळे त्या उमेदवारालाही माहिती असेल की कुस्ती जिंकण्यासाठी पैलवानाचा वस्ताद किती महत्त्वाचा असतो. कसबा पोटनिवडणुकीत सगळेच आम्हाला कमजोर समजत होते. मात्र प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एकटाच इथे काँग्रेसचा झेंडा लागणार हे सांगत होतो. तसेच झाले की नाही तुम्हीच सांगा.”
काँग्रेस पुण्यातील उमेदवार जाहीर कधी करणार या प्रश्नावर पटोले यांनी, पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांबरोबरच पुण्यातील उमेदवारही जाहीर होईल असे सांगितले. आमची शुक्रवारी संयुक्त बैठक आहे. त्यामध्ये जागा व उमेदवार यावर चर्चा होईल. आमचा उमेदवार तयार आहे, त्याचे नाव लवकरच जाहीर करू असे ते म्हणाले. त्यांनी उमेदवार जाहीर केला असला तरी त्याचा आम्हाला काहीही फरक पडणार नाही, ही जागा आम्ही जिंकणारच असे त्यांनी सांगितले.