पुणे : पावसामुळे राज्यातील १४ लाख एकर जमिनीवरील पिके नष्ट झाली आहेत. त्याचे पंचनामे करावेत व नुकसानभरपाई द्यावी, याचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंचनामे झाल्याशिवाय नुकसानभरपाई देता येत नाही, कोणतीही मागणी न होता सुद्धा हे आदेश देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
पुण्यात काही कार्यक्रमांसाठी आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील काही ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्तीसंदर्भात ते म्हणाले, जी काळजी घ्यायला हवी, ती घेतलेली आहे. जिथे नद्यांची पातळी धोक्याचा इशारा देण्याच्या वर गेली, तिथे धरणांमधून विसर्ग करत पाण्याचे व्यवस्थापन सुरू आहे. अन्य काही राज्यांबरोबर चर्चा सुरू असून, त्यांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा मदतीची विनंती करण्यात येईल.
मुंबईतील ‘बेस्ट’मधील कामगारांच्या पतपेढीची निवडणूक झाली, त्यात ठाकरे बंधूंना अपयश आले. याबाबत फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही अशा कोणत्याही निवडणुकीचे राजकीयीकरण करत नाही. कोणीही ते करू नये, असेच माझे मत आहे. शशांक राव व प्रसाद लाड हे आमचे असले तरी त्यांनीही या निवडणुकीत कसलेही राजकारण आणले नाही. ज्यांनी ते केले, त्यांचे लोकांनी काय केले ते दिसले आहे. लोकांना ठाकरे ब्रँड वगैरे आवडलेलं दिसत नाही, त्यामुळेच त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्यांना रिजेक्ट केलं गेलं.
पुण्यात विसर्जन मिरवणुकांबाबत वाद निर्माण झाला आहे. याकडे लक्ष वेधले असता, फडणवीस यांनी दरवर्षीच गणेशोत्सवात पुण्यामध्ये वाद होतात व नंतर ते मिटतातही, असे सांगितले. याही वेळी ते मिटतील, त्यामध्ये सरकारने लक्ष घालण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. जनता वसाहतीत टीडीआर घोटाळा झाला असला तर त्यांची कोणतीही माहिती आता नाही, ती घेतल्यानंतरच यावर बोलता येईल. मात्र, कुठेही काहीही बेकायदेशीर काम झाले असेल तर ते त्वरित थांबविण्यात येईल. सिडकोतील जमीन घोटाळ्याबाबत रोहित पवार बोलतात, मात्र ही सगळीच मंडळी रोजच वेगवेगळे आरोप करतात, पुरावे कशाचेच देत नाहीत. विनापुराव्याचे आरोप करण्यात काही अर्थ नाही. सिडकोमधील प्रकरण काय हे तेच मला माहिती नाही, असे फडणवीस म्हणाले.