पुणे : मुळशी तालुक्यातील बोतरवाडी ते उरवडे इतर जिल्हा मार्ग क्रमांक ६९ वरील रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर कार्यकारी अभियंता हेमंतकुमार चौगुले हे स्वतः प्रत्यक्ष पाहणीसाठी जाणार आहेत. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.
या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर २ डिसेंबर २०२४ मध्ये निघाली होती. त्याचे बिल काढले १ फेब्रुवारी २०२५ काढण्यात आले. असे असताना या कामावर खडी पसरून खुदाई केली. दीड वर्षापूर्वी म्हणजे २२ ऑगस्ट २०२३ आणि विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा टेस्ट रिपोर्ट हा बिल अदा केल्यानंतर ७ फेब्रुवारी २०२५ रोजीचा. प्रत्यक्षात या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत दहा लाख रुपये खर्च झाले आहेत.
जिल्हा परिषदेकडून या कामाच्या चौकशीमध्ये आणि प्रत्यक्ष पाहणीसाठी विलंब केला जात आहे. याचे कारण म्हणजे याच रस्त्यावर पीएमआरडीए मार्फत जवळपास दहा कोटी रुपयांचे काम मंजूर झाले असून, त्याची सुरुवातदेखील होत आहे. त्यामुळे या कामांमध्ये हा रस्ता उकरला गेल्यास पुरावा नष्ट होऊ शकतो. परंतु, या रस्त्याचे बिल अदा करताना जोडलेले कागदपत्रे बघता काम आधी वर्क ऑर्डर नंतर आणि टेस्ट रिपोर्ट मिळण्याच्या अगोदर बिल अदा केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आता जिल्हा परिषद कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.