‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका

By विश्वास मोरे | Updated: April 18, 2025 19:52 IST2025-04-18T19:48:25+5:302025-04-18T19:52:48+5:30

मनसेने मराठी पाट्या आणि शासकीय कार्यालयांत मराठीचा आग्रह धरून राज्यभर जागृती अभियान सुरू केले

Opposition to Hindi comes from those who have no business; Ajit Pawar criticizes Raj Thackeray without naming him | ‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका

‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका

पिंपरी : हिंदी आपली राष्ट्रभाषा आणि मराठी ही मातृभाषा आहे, तर इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचे काही कारण नाही. ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, तेच हिंदी भाषेला विरोध करतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

मनसेने मराठी पाट्या आणि शासकीय कार्यालयांत मराठीचा आग्रह धरून राज्यभर जागृती अभियान सुरू केले आहे. मराठीचा आग्रह आणि हिंदीला विरोध केला जात आहे, याबाबत पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांना विचारले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, मराठी आपली मातृभाषा आहे आणि काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मात्र, ज्यांच्याकडे काही उद्योग नाही, ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत.

बीडचे निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पोलिस यंत्रणेवर आरोप केले आहेत. त्यावर पवार म्हणाले की, निलंबित असलेल्या कासले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

बीडमध्ये महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, याविषयी पवार म्हणाले की, बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली, तिचे फोटो मला काल रात्री उशिरा मिळाले आहेत. जे दोषी असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
 
कोणालाही सोडले जाणार नाही
अजित पवार म्हणाले की, नाशिक दंगल प्रकरणात आम्ही कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून केस दाखल केलेली नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहोत. कोणालाही सोडले जाणार नाही.  

Web Title: Opposition to Hindi comes from those who have no business; Ajit Pawar criticizes Raj Thackeray without naming him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.