सनबर्न फेस्टिवलला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 00:54 IST2018-12-25T00:53:29+5:302018-12-25T00:54:08+5:30
नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्याजवळ असलेल्या लवळे गावच्या हद्दीमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुळशीकरांच्या वतीने आमचा पूर्णपणे विरोध असून, त्यासाठी मोठे जनआंदोलन करणार असल्याची माहिती

सनबर्न फेस्टिवलला विरोध
भूगाव : नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्याजवळ असलेल्या लवळे गावच्या हद्दीमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुळशीकरांच्या वतीने आमचा पूर्णपणे विरोध असून, त्यासाठी मोठे जनआंदोलन करणार असल्याची माहिती मुळशी तालुक्याचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप मारणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी सचिव दत्तात्रय जाधव हेही उपस्थित होते.
पुणे शहर हे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते, परंतु हा सनबर्नचा नंगानाच लवळे येथील फ्लेम युनिव्हर्सिटीच्या तसेच सिंबायोसिस या शैक्षणिक संस्थांच्या संकुलांच्या काही मीटर अंतरावरच होणार असल्याने तालुक्यातून तसेच पुण्यातून संताप व्यक्त केला जात आहे. सनबर्नचा इतिहास हा स्पष्ट ड्रग्स, गैरवर्तन आणि अश्लीलतेविषयी बोलतो. सनबर्नमुळे तरुणांवर वाईट परिणाम होऊन ते वाईट मार्गाला जाण्याची जास्त शक्यता आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये अश्लीलताही मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळते. अशाच काही कारणांमुळे गोवा सरकारने सनबर्न फेस्टिव्हलसारख्या कार्यक्रमास परवानगी नाकारली. राज्य आणि केंद्र सरकार तसेच माननीय उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने गणपतीच्या उत्सवांमध्ये डीजे, डॉल्बी, तसेच दुर्गामाता उत्सव आणि त्याच संगीत प्रणालीचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. मग यांना परवनगी कशी मिळाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सनबर्न पार्टी फेस्टिवल हे रेव्ह पार्टीसारखाच होणार आहे. सामाजिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक तसेच नैसर्गिक आणि मानवतेच्या भारतीय संस्कृती नष्ट करणारा हा उत्सव
आम्हाला नको आहे, जो तालुक्यातील वातावरण दूषित करून तरुण-तरुणींना व्यसनाधीनतेकडे घेऊन जाईल.
- अनुप मारणे (अध्यक्ष, मुळशी तालुका भाजपा युवा मोर्चा)