ऑनलाईन लॅपटॉप पसंत केला अन् गंडला!
By भाग्यश्री गिलडा | Updated: October 18, 2023 16:57 IST2023-10-18T16:57:10+5:302023-10-18T16:57:37+5:30
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑनलाईन लॅपटॉप पसंत केला अन् गंडला!
पुणे: ऑनलाईन लॅपटॉप पसंत करून खरेदी करणे चांगलेच महागात पडल्याचे वारजे परिसरात झालेल्या फसवणुकीच्या घटनेवरून लक्षात आले. लॅपटॉप विक्री करण्याच्या बहाण्याने वारजे परिसरात राहणाऱ्या एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार १७ मे २०२३ ते २१ मे २०२३ दरम्यान घडला आहे. याप्रकरणी प्रसाद लक्ष्मण निकम (वय - ३७, रा. वारजे) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादींना अनोळखी क्रमांकावरून लॅपटॉप विक्रीसाठी आहे असा मेसेज आला. त्यानंतर वेगवगेळ्या लॅपटॉपची फोटो पाठवत तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. पाठवलेल्या लॅपटॉप पैकी तक्रारदार यांना ६ लॅपटॉप आवडले. लॅपटॉप खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादींना ६८ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. पैसे भरून सुद्धा लॅपटॉप न मिळाल्याने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे निकम यांच्या लक्षात आले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.