आयपीएल मॅचवर ऑनलाइन सट्टा, दोन सट्टेबाजांना अटक; पुण्यात पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 19:29 IST2024-04-19T19:28:20+5:302024-04-19T19:29:14+5:30
ही कारवाई बुधवारी (दि. १७) रात्री पावणे दहाच्या सुमारास सॅलिसबेरी पार्क येथील पौर्णिमा अपार्टमेंट येथे करण्यात आली...

आयपीएल मॅचवर ऑनलाइन सट्टा, दोन सट्टेबाजांना अटक; पुण्यात पोलिसांची कारवाई
पुणे : आयपीएल मॅचवर वेगवगळ्या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने सट्टा घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक करून एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १७) रात्री पावणे दहाच्या सुमारास सॅलिसबेरी पार्क येथील पौर्णिमा अपार्टमेंट येथे करण्यात आली. यामध्ये वसीम बाबासाहब बागवान (वय ३६, रा. सनराइज अपार्टमेंट, हांडेवाडी रोड, हडपसर), तेजस कन्हैयालाल रूपारेल (वय ४२, पौर्णिमा अपार्टमेंट, सॅलिसबेरी पार्क, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक - १ चे अधिकारी व कर्मचारी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकाला गुप्तहेरामार्फत माहिती मिळाली की, पौर्णिमा अपार्टमेंट येथील बी बिल्डींगमधील फ्लॅट नं. १५ मध्ये आयपीएलमधील दिल्ली टीम विरुद्ध गुजरात टीम या क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळवला जात आहे.
मिळालेल्या माहितीची खात्री करून पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आरोपी त्यांच्या मोबाइलमध्ये वेगवेगळ्या वेबसाइटचा वापर करून ऑनलाइन जुगार खेळत असल्याचे आढळले. आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडून १ लाख ५ हजार रुपये किमतीचे ५ मोबाइल फोन जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर करत आहेत.