पुणे महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 08:41 PM2020-05-30T20:41:32+5:302020-05-30T20:42:06+5:30

पुणेकरांना दिलासा; होणार नाही कोणतीही दंड आकारणी

One month extension for payment of tax from Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ

पुणे महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाईन व्यवहाराद्वारे पुणेकरांनी २८० कोटी रुपयांचा कर केला जमा

पुणे : महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मिळकत कराचा भरणा करण्याकरिता एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप मिळकत कर भरु न शकलेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारची दंड आकारणी केली जाणार नाही. कर भरणा करण्याची मुदत ३१ मे रोजी संपत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेचे २०२०-२१ हे आर्थिक वर्ष मार्चमध्ये सुरु झाले. स्थायी समितीने मुख्यसभेसमोर यंदाचे सात हजार कोटींचे अंदाजपत्रकही सादर केले. या अंदाजपत्रकामध्ये विविध योजनांमधून जवळपास एक हजार कोटींनी उत्पन्न वाढविण्याची ग्वाही स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली होती. गेल्या वर्षी मिळकत कर भरण्याकरिता ३१ मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. या काळात ६५० कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला होता. यंदा कोरोनामुळे मार्चमध्येच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मिळकत कर जमा होण्यात अडचणी आल्या आहेत. त्यातही ऑनलाईन व्यवहाराद्वारे पुणेकरांनी २८० कोटी रुपयांचा कर जमा केला आहे.
अनेकांना अद्यापही मिळकत कर भरणे शक्य झालेले नाही. इंटरनेटला पुरेसा स्पीड मिळत नसल्याने ऑनलाईन कर भरणा करण्यातही अडचणी येत आहेत. यासोबतच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गर्दी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना कर भरणे अडचणीचे होत आहे. त्यातच ३१ मे ही कर भरणा करण्याची शेवटची तारीख असल्याने नागरिक ही मुदत वाढवून देण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे महापालिका कर भरणा करण्याकरिता मुदत वाढवून देण्याचा विचार करीत आहे. यावर मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.
======
महापालिका हद्दीतील १० लाख ५७ हजार ७१६ मिळकतींमधून १ हजार ५११.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. जुन्या हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या ९ लाख १३ हजार ८५५ इतकी असून त्यांच्याकडून १ हजार ३६५ कोटी २४ लाख रुपये तर नवीन समाविष्ट ११ गावांमधील १ लाख ४३ हजार ८६१ मिळकतींमधून १४६ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
========
१ एप्रिल ते २८ मे या काळात २ लाख ३३ हजार पुणेकरांनी २८० कोटींचा भरणा केला आहे. यातील २ लाख ९ हजार ५६४ नागरिकांनी २२३ कोटी ४३ लाखांचा कर जमा केला आहे. तर, ११ हजार २३२ मिळकतधारकांनी ३६ कोटी ७० लाखांचा कर धनादेशाद्वारे जमा केला आहे. तर ९ हजार ३११ मिळकतधारकांनी ८ कोटी ३४ लाख रुपयांचा कर रोखीने भरला आहे. पालिकेने सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रावर ११ मे ते २८ मे या काळात २० हजार १७२ मिळकतधारकांनी ४६ कोटी ६२ लाख रुपयांचा कर जमा केला आहे.
=========
पुणेकरांना लॉकडाऊनमुळे मिळकत कर भरणा करण्यात अडचणी येत आहेत. आतापर्यंत पुणेकरांनी ३०० कोटींच्या आसपास कर भरला आहे. त्यांची अडचण अनेकांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. पुणेकरांचा विचार करुन मिळकत कर भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा विचार सुरु आहे. मंगळवारच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय होईल.
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती
=====
गेल्या वर्षी कर भरणा करण्याकरिता ३१ मेपर्यंतची मुदत होती. गेल्या वर्षी ३१ मेपर्यंत ६५० कोटींचा कर जमा झाला होता. पुणेकरांना कर भरणा करण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाईन व्यवहार वाढल्याने संकेतस्थळावरही ताण आला आहे. त्यामुळे स्थायी समितीने मुदतवाढ दिल्यास कर भरणा वाढण्यास मदतच मिळेल. त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्न वाढीवर होईल.
- विलास कानडे, प्रमुख, कर संकलन व कर आकारणी विभाग
========
महापालिकेच्या संकेतस्थळावरील मिळकत कर भरण्याच्या पेजवर प्रचंड ताण आल्याने शनिवारी हे पेजच बंद पडले होते. ऑनलाईन कर भरणा करण्याकरिता हे पेज ओपन करताच  'विल बी बॅक इन फ्यू अवर्स'असा मेसेज दिसत होता. त्यामुळे अनेकांना कर भरता आला नाही. याबाबत विभाग प्रमुख विलास कानडे यांच्याशी संपर्क साधला असता, संकेतस्थळावरील ताण वाढल्याने आधी नागरी सुविधा केंद्रांवरील भरणा करुन घेण्याकरिता काही काळासाठी संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले होते. ते नंतर सुरळीत करण्यात आल्याचे सांगितले.

Web Title: One month extension for payment of tax from Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.