जेवणात कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी जहांगिर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 20:42 IST2019-05-16T20:29:50+5:302019-05-16T20:42:20+5:30
जहांगिर हॉस्पिटलमधील एका महिला रुग्णाच्या जेवत कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने जहांगिर हॉस्पिटलला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जेवणात कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी जहांगिर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड
पुणे: जहांगिर हॉस्पिटलमधील एका महिला रुग्णाच्या सूपात कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने जहांगिर हॉस्पिटलला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच हॉस्पिटलमधील कँटिनची तपासणी केल्यानंतर आढळून आलेल्या त्रुटी पूर्ततेचा अहवाल सादर करण्यासाठी नोटीस बजावली असून कँटिनमध्ये मे महिन्याअखेरपर्यंत सुधारणा करण्यास संधी दिली आहे.
हॉस्पिटलच्या कँटीनमधून रुग्णांना दिल्या जाणा-या सूपात कापसाचे बोळे आढळल्याप्रकरणी हडपसर येथील महंमदवाडीचे रहिवासी महेश सातपुते यांनी एफडीएकडे हॉस्पिटल प्रशासन, पोलीस, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यावर एफडीएच्या अधिका-यांनी कँटीनची तपासणी केली. त्यात रुग्णालयातील कँटिनमध्ये अस्वच्छता आढळून आली. तसेच अन्न पदार्थ तयार करणा-या व्यक्तींसाठी व हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी एकच स्वच्छतागृह असल्याचे समोर आले. परंतु,कँटिनमधील सर्व उपकरणे योग्य स्थितीत असल्याचे तपासणीतून दिसून आले. मात्र, कँटिनमध्ये अस्वच्छता असल्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.काकडे यांनी एफडीएचे पुणे विभागीय सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्याकडे हॉस्पिटल विरोधात खटला दाखल केला. बुधवारी हॉस्पिटल प्रशासनाला बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली होती. देशमुख यांनी एफडीएच्या अधिका-यांचे आणि हॉस्पिटलचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर हॉस्पिटला एक लाख रुपये दंड केला,असे एफडीएच्या सहायक आयुक्त ए.ए.भोईटे यांनी सांगितले.