Pune Crime: सहकारनगर भागात किरकोळ वादातून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा
By नितीश गोवंडे | Updated: March 2, 2024 15:20 IST2024-03-02T15:19:27+5:302024-03-02T15:20:41+5:30
शवविच्छेदन अहवालात कांबळे यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले...

Pune Crime: सहकारनगर भागात किरकोळ वादातून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा
पुणे : किरकोळ वादातून एकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगरपोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तुकाराम निवृत्ती कांबळे (५७, रा. समता सोसायटी, सहकारनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कुशल शिंदे (रा. समता सोसायटी, सहकारनगर), लखन भिसे आणि शानू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांबळे यांची भावजय अनिता (५५) यांनी याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे आणि आरोपी शिंदे, भिसे, शानू ओळखीचे आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. आरोपी कांबळे यांच्या घरात शिरले. ‘नाना तू माझा भाऊ विशाल याच्यावर खोटा आळ का घेतो. माझ्या भावाची बदनामी का करतो ?’, अशी विचारणा करून आरोपी शिंदे आणि साथीदारांनी कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाणीत गंभीर जखमी झालेले कांंबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात कांबळे यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश नलावडे करत आहेत.