एकच ध्यास.. हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक पटकावयाचाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:28 IST2025-09-12T11:27:25+5:302025-09-12T11:28:08+5:30
- नऊ संघ अंतिम फेरीत शनिवारी-रविवारी होणार सादरीकरण; विद्यार्थ्यांची कसून तयारी सुरू

एकच ध्यास.. हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक पटकावयाचाच...
पुणे : आमची एकांकिका अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद आहेच, पण आठही संघ तितकेच ताकदीचे असल्याने आम्ही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कसून तयारी करीत आहोत. आम्ही प्राथमिक फेरीत नाट्य संकल्पना, संवाद लेखन आणि अभिनयाकडे विशेष लक्ष दिले. मात्र, प्रत्यक्ष सादरीकरणावेळी ज्या त्रुटी आढळल्या. त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आस्था काळे हिने सांगितले.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या नऊ संघांची अंतिम फेरी भरत नाट्य मंदिरात होत आहे. शनिवारी (दि. १३) सायंकाळी ५ ते ८ तर रविवारी (दि. १४) सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळात सहभागी संघांचे सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरक महोत्सवी स्पर्धेच्या पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरण्यासाठी अंतिम फेरीतील नऊ संघ करंडक पटकावयाचाच या जिद्दिने आणि ध्यासाने स्पर्धेत उतरले आहेत. त्यानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
महाविद्यालयाने यापूर्वी स्पर्धेत विविध बक्षिसे मिळविली आहेत. पण यंदाचा संघ पूर्णपणे नवीन आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर आमच्या महाविद्यालयाला स्पर्धेत सहभाग मिळाला ही आमच्या दृष्टीने मोठी संधी आहे. अंतिम फेरीत पोहोचल्याने उत्साह दुणावला आहे. अंतिम फेरीत शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न आहे. - पार्थ करपे, श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय
स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेतला आणि अंतिम फेरीत पोहोचलो. अंतिम फेरीत सादरीकरणासाठी सर्वच जण उत्सुक आहोत. अंतिम फेरीच्या दृष्टीने जे थोडेफार बदल केले आहेत. ते नक्कीच पसंतीस पडतील असा विश्वास आहे. - प्रसाद लोहकरे, डीईएस, पुणे युनिर्व्हसिटी
स्पर्धेच्या पहिल्या वर्षापासून महाविद्यालयाने दर्जेदार एकांकिका दिल्या आहेत. स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने स्पर्धेतील सहभाग आमच्या दृष्टीनेही मोलाचा आहे. सलग तिसऱ्या वर्षी आमचे महाविद्यालय अंतिम फेरीत पोहोचले आहे. यंदा एकांकिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे. - उर्व चिंचवडे, स. प. महाविद्यालय
महाविद्यालय अनेक वर्षांपासून स्पर्धेत सहभागी होत असून स्पर्धेत विविध पारितोषिकेही मिळाली आहेत. प्राथमिक फेरीत उत्कृष्ट सादरीकरण करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असल्याने अंतिम फेरीत अधिक नेटकेपणाने सादरीकरणाचा प्रयत्न आहे. - तुकाराम लव्हरे, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय
महाविद्यालय अंतिम फेरीत चौथ्यांदा पोहोचले आहे. स्पर्धेचे दडपण आहे; परंतु प्रयोग व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आहेच. दशावतारावर नाटक आधारित असल्याने आम्ही बराच अभ्यास केला. स्पर्धेमुळे जुन्या परंपरांचा अभ्यास झाल्याने अंतिम फेरीतील सादरीकरणाची उत्सुकता आहे. - अनिकेत खरात, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड
वास्तववादी विषय हीच आमच्या एकांकिकेची ताकद आहे. प्राथमिक फेरीत प्रामाणिकपणे सादरीकरण केल्याने महाविद्यालय अंतिम फेरीत पोहोचले आहे. यंदा आमच्या एकांकिकेला करंडक मिळेल असा विश्वास असून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. - रागिणी आळंदकर, पुणे विद्यार्थिगृहाचे अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालय