हडपसर येथे दीड वर्षांच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरुन फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 21:09 IST2018-09-11T21:08:37+5:302018-09-11T21:09:10+5:30
पाणी भरण्यावरून शेजाऱ्यांबरोबर झालेल्या वादातून दीड वर्षाच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हडपसर येथे दीड वर्षांच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरुन फेकले
पुणे : पाणी भरण्यावरून शेजाऱ्यांबरोबर झालेल्या वादातून दीड वर्षाच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील हिंगणे मळा येथे ही घटना गेल्या महिन्यात घडली आहे. पालकांना मुलगी पडली नसून, तिला फेकुन दिल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सोमवारी(दि.१२) हडपसरपोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सुरवी सुधीर कांबळे (वय दीड वर्ष) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी रमेश कुंडलिक लोंढे (वय ४५, रा. नवीन म्हाडा वसाहत, हिंगणे मळा, हडपसर) याच्यासह एका महिलेवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुलीचे वडील सुधीर कांबळे यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर कांबळे हे रंगकामे करतात. तर, रमेश लोंढे हा महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीस आहे. दरम्यान कांबळे आणि लोंढे हे दोघेही नवीन म्हाडा वसाहतीत दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांची घरे एकमेकांसमोर आहेत. ही इमारत चार मजल्यांची आहे. त्यांच्यात पिण्याचे पाणी भरण्यावरून गेल्या महिन्यात वाद झाले होते. वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडण झाले. मात्र, त्यानंतर हे वाद मिटविण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनीच २८ आॅगस्ट रोजी कांबळे यांची दीड वर्षांची मुलगी सुरवी ही दुसऱ्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली. नागरिकांनी व पालकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार करण्यात आले. सुदैवाने यात तिला गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, मुलगी गॅलरीतून कशी कोसळली. याबाबत तिच्या पालकांनी शोध घेतला. त्यांचा लोंढे यांच्यावर संशय होता. त्यांनी चौकशी केल्यानंतर रमेश यांने मुलीला फेकुन दिल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सोमवारी हडपसर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक देशमुख हे करत आहेत.