अधिकारी सरकारची फसवणूक करतात : तानाजी सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 20:30 IST2019-09-11T20:30:25+5:302019-09-11T20:30:43+5:30
पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनपासून पुढील भागात पाऊस नाही. अगदी जनावांराना जमीन खुरडायला देखील गवत उगवलेले नाही...

अधिकारी सरकारची फसवणूक करतात : तानाजी सावंत
पुणे : राज्यात शंभर टक्के पाऊस, अमूक ठिकाणी १३२ टक्के पाऊस अशी माहिती दिली जाते. मात्र,सोलापूर, मराठवाडा, अगदी अतिवृष्टी झालेला सांगली, साताऱ्याचा काही भाग, पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनपासून पुढील भागात पाऊस नाही. अगदी जनावांराना जमीन खुरडायला देखील गवत उगवलेले नाही. अधिकारी चुकीची आकडेवारी सादर करुन सरकारची एकप्रकारे फसवणूक करीत असल्याची टीका जलसंधारण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी केली.
मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने यशदा येथे आयोजित आदर्श गाव पुरस्कारांचे वितरण सावंत यांच्या हस्ते झाले. कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कृषी उपसंचालक महादेव निंबाळकर, मृद संधारण विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते, सहसंचालक दादाराम सप्रे उपस्थित होते.
यवतमाळमधील कोठोडा गाव ठरले आदर्श
यवतमाळ जिल्ह्यामधील पांढरकवडा तालुक्यातील कोठोडा गावाने पाच लाख रुपयांचे आदर्श गावाचे पारितोषिक पटकावले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भागडी गावांना तीन लाख रुपयांचे द्वीतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील गोधनी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील विरसई गावाला २ लाख रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार विभागून दिला.