अडत्यांची दफ्तरे बाजार समितीने घेतली ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:51 IST2019-01-09T00:50:37+5:302019-01-09T00:51:01+5:30
डाळिंब यार्ड : निलंबनाची नोटीस

अडत्यांची दफ्तरे बाजार समितीने घेतली ताब्यात
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब यार्डमधील आडत्यांनी डाळिंब उत्पादक शेतकरी आणि खरेदीदारांची हमाली आणि लेव्हीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या आडत्यांचे दफ्तर बाजार समितीने मंगळवार (दि.८) रोजी ताब्यात घेतले. या लुटीप्रकरणी त्या आडत्यांना परवाना निलंबनाची शोकॉज नोटीस बजावली असून, यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
बाजारातील डाळिंब यार्डातील चार आडत्यांनी हमाली आणि लेव्हीच्या रकमेत नियमापेक्षा जास्त कपात केली. त्यानंतर बाजार समितीने खासगी ७ सनदी लेखापालांकडून मार्केट यार्डातील सर्वच आडत्यांच्या दफ्तर तपासणीचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या आदेशानुसार आज डाळिंब यार्डातील ४ आडत्यांचे तर भाजीपाला विभागातील इतर ३ आडत्यांचे दफ्तर तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.
या आडत्यांकडून ताब्यात घेतलेल्या दफ्तरात २०१६-१७ पासूनच्या शेतमाल पट्ट्या, खरेदीदारांच्या पट्ट्यांचा समावेश आहे. आडत्यांकडे २०१५-१६ वर्षाचे रेकॉर्ड मिळाले उपलब्ध झाला नाही. मात्र, बाजार समितीकडे शेतमाल पट्ट्या जमा असतात. त्यावरून लूट केलेल्या रकमेचा आकडा काढावा लागेल.
या चारही आडत्यांचा शेतकरी व खरेदीदारांच्या शेतमाल पट्ट्या कॉम्प्युटराईज्ड असल्याने हार्ड डिस्क, काही कॉम्प्युटरमधील डेटा पेन ड्राईव्हमध्ये घेतला आहे. कॉम्प्युटराईज्ड डेटा असल्यामुळे किती लूट झाली ते समजेल.